Dainik Maval News : वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची व्याप्ती वाढल्याने न्यायालयाची सध्याची इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात प्रस्तावित दहा मजली नवीन इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने केली आहे.
- असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. रंजना भोसले, माजी अध्यक्ष ॲड. सोमनाथ पवळे, सचिव अॅड. अक्षय रौंधळ आदींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथील जिल्हा सत्र न्यायालयाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यःस्थितीत वडगाव मावळ न्यायालयात दोन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, तीन वरिष्ठ दिवाणी स्तर न्यायालय व सहा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश कार्यरत आहेत. परंतु त्यांना बसण्यास तसेच कामकाज करण्यासाठी सध्याच्या इमारतीमध्ये जागा अपुरी पडत आहे.
न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, वकील वर्ग, पक्षकार यांचीही अपुऱ्या जागेमुळे गैरसोय होत आहे. कॅन्टीन, बार रूम, लायब्ररी आदी सुविधांसाठी प्रशस्त जागेची गरज आहे. येथे पार्किंगचीही मोठी समस्या आहे. त्यामुळे मंजूर असलेल्या प्रस्तावित दहा मजली नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे.
या इमारतीसाठी सर्व विभागाच्या परवानग्या मिळालेल्या आहेत. शासन स्तरावर अंतिम मंजुरीसाठी हा प्रकल्प प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत न्यायाधीश निवासस्थानासाठी १४ आर जागेचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे ते देखील बांधकाम लवकरात लवकर शासन स्तरावर मंजुरी मिळून सुरू होणे आवश्यक आहे. येथील गैरसोयी लक्षात घेऊन लवकरात लवकर हाय पॉवर कमिटीची व वित्त विभागाची मंजुरी घेऊन लवकरात लवकर सदर बांधकामाची निविदा प्रक्रिया राबवावी व इमारतीचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन