मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यासह 10 अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुनर्रचित टास्क फोर्स सदस्यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. सावंत यांनी सदस्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक तथा टास्क फोर्सचे सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. ( Corona Alert Special attention should be paid to 10 districts including Mumbai Pune said Health Minister Tanaji Sawant to Covid Task Force )
डॉ. सावंत म्हणाले, कोविड-19 चाचण्यांची संख्या वाढवावी. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मॉकड्रीलमध्ये आढळलेल्या त्रुटींचे तत्काळ निराकरण करावे. मास्कचा वापर करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात यावे. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कोविड बाधितांना मेटाफॉर्मिन गोळीचा फायदा दिसून येतो. पण या गोळीचा प्रोटोकॉलमध्ये समावेश नाही, असे यावेळी डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. यावर या गोळीचा रुग्ण बरे होण्यासाठी मदत होत असल्यास त्याबाबतचे संशोधन टास्क फोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण झाल्यावर रुग्णांना ऑक्सिजनची विशेष गरज भासत नाही. पण संसर्ग पाहता कोविडची लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले. कोविड चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत का याची खात्री करावी, नियमित पर्यवेक्षण करावे, प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण जास्त जोखमीची नाही. लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. हा संसर्ग पंधरा मेपासून कमी होऊ लागेल, असे सर्व सदस्यांनी बैठकीत सांगितले.
अधिक वाचा –
– पुण्यात उबेरसह ‘या’ चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा ‘ॲग्रीगेटर लायसन्स’ नाकारले
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 : महाविकास आघाडीच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ अन् विजयाचा ‘एल्गार’
– चोरीला गेलेली ‘लक्ष्मी’ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुन्हा दारी; वडगाव मावळ पोलिसांकडून 32 वाहने मूळ मालकांना सुपूर्द