Dainik Maval News : कृषी आणि पर्यटन यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यात इतरही अनेक उद्योग व्यवसाय सुरु आहेत. प्रयोगशील शेती, लहान मोठे-उद्योग व्यवसाय तालुक्यात चांगल्या प्रमाणात सुरू असून यामुळे त्या त्या भागाची स्वतंत्र ओळख निर्माण होताना दिसत आहे. अशाच प्रकारे ग्रामीण भाग असलेल्या पवन मावळ विभागातील मौजे शिळींब या निसर्ग संपन्न आणि कृषीबहुल गावाची ओळख आता गणपतीचे गाव अशी होऊ लागली आहे. चार पिढ्यांचा गणपती मूर्ती निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या येथील कुंभार बांधवांमुळे गावाला नवीन ओळख आणि परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
शिळींब हे गाव पुण्यापासून साधारण चाळीस किलोमीटर दूर आहे. तर जुन्या मुंबई पुणे हायवे पासून 25 आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापासून 20 किलोमीटर दूर आहे. तसेच लोणावळा, कामशेत ही प्रमुख ठिकाणे गावापासून 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. पवना धरण जलाशयाच्या बॅकवॉटर भागात असलेले आणि तुंग, तिकोणा किल्ल्यांपासून काही एक किलोमीटर अंतरावर असलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठी आकर्षण आहेच, सोबत आता येथील गणपती उद्योगामुळे हे गाव गणपतीचे गाव म्हणून नावारुपाला आले आहे.
चार पिढ्यांचा व्यवसाय –
शिळींब गावात कुंभार बांधवांची एकूण आठ ते दहा घरे आहेत. यातील काही घरे वगळता, सर्वजण गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय करतात. यातील काहींनी गणेशमूर्ती व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप दिले असून कारखाने उभारले आहेत. पूर्वी जेव्हा बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती, तेव्हा ह्या कुंभार बांधवांकडून मडकी-चुली बनविणे, गणपती बनविणे व ते विकणे आणि बलुते गोळा करून आपला चरितार्थ चालविला जात होता. परंतु हळूहळू बलुतं पद्धत बंद होऊन पिढ्यांनुसार काहीजण नोकरीत तर काहींनी गणपती व्यवसायात स्वतःला गुंतवूण घेतले आहे. आता जवळपास प्रत्येक घरातील तरूण गणेशमूर्ती व्यवसायात उतरला असून त्यांनी गणेशमूर्ती व्यवसाय आणखीन वाढविला आहे. एकेकाळी जिथे कुंभार बांधवांच्या सर्व घरांमध्ये मिळून पाचशे गणपती निर्मिती-विक्री होत होती, तिथे आता शिळींब गावातील ह्या गणपतीमूर्ती व्यवसायिकांकडून एकत्रित जवळपास आठ ते दहा हजार गणपतींची निर्मिती, विक्री होत आहे.
गणपती व्यवसायातून चालतो कुटुंबाचा चरितार्थ –
विशाल आर्ट्स, शुभम आर्टस, अर्जुन आर्ट्स, शिवशंभो आर्ट्स, भैरवनाथ आर्ट्स ह्या कारखान्यांतून सर्वाधिक गणेशमूर्तींची निर्मिती आणि विक्री होताना दिसते. याबाबत येथील गणेशमूर्ती व्यवसायिकांशी संवाद साधला असता त्यांनी, आमच्या चार पिढ्यांचा हा व्यवसाय असून पूर्वी गावातील लाल मातीचे गणपती घरोघरी जावून करत होतो, परंतु आता कारखान्यांतच शाडू, पीओपी चे गणपती बनवित असल्याचे सांगितले. एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून येथील कुंभार बांधव गणेशमूर्ती व्यवसायात गुंतलेले दिसतात, ज्यातून त्यांच्या कुटुंबांचा चरितार्थ चालतो आहे.
परंपरेला आधुनिकतेची जोड –
पूर्वी बलुतेदार पद्धत होती, तेव्हापासून शिळींब गावच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये आमच्या घरातील गणपतीमूर्ती नेल्या जात होत्या. आजही शिळींब, आजिवली, चावसर, मोरवे, तुंग ठिकाणी आमच्या कारखान्यातील गणपती असतात. यांसह शहरी भागातील अनेक विक्रेतेही गणपती खरेदी करीत असल्याचे विशाल आर्ट्स चे सर्वेसर्वा भगवान दरेकर (कुंभार) यांनी सांगितले. तर, परंपरागत व्यवसाय करीत असताना त्याला आधुनिकतेची जोड देऊन तंत्र – यंत्र यांच्या सहाय्याने व्यवसाय वाढवित असल्याचे शुभम आर्ट्स चे सर्वेसर्वा बाळू दरेकर यांनी सांगितले.
बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती –
गणपती निर्मिती व्यवसायात उतरलेल्या तरूण पिढीतील शिवशंभो आर्टचे सर्वेसर्वा शिवाजी दरेकर आणि शंकर दरेकर या बंधूंनी गणेशमूर्ती व्यवसाय हा पूर्णवेळ करण्याचे ठरविले असून त्यामुळे त्यांच्या कारखान्यातून वेगवेगळ्या शहरांत, गावांत गणपती मूर्तींचे विक्री होते. नवनवीन पद्धतीने गणपती मूर्ती रंगविण्याची कला अवगत केलेले शुभम दरेकर यांनीही हा व्यवसाय आणखीन वाढविण्याच मनोदय व्यक्त केला आहे. तर, सर्वाधिक गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय करणारे अर्जुन आर्ट्सचे सर्वेसर्वा अर्जुन दरेकर व एकनाथ दरेकर यांनी ह्या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळत असून आमच्या कुटुंबाची आर्थिक गरज भागविली जात असल्याचे सांगितले.
गणेशमूर्ती व्यवसाय करणे हे तितके सोपे नाही. भांडवल, जागा, वीज, मजूर यांसाठी मोठी रक्कम खर्च होते. पीओपी आणि शाडू मूर्ती बाबत सरकारी धोरण धरसोड वृत्तीचे राहिल्याचा मोठा फटका बसला, परंतु यंदा सरकारने सकारात्मक निर्णय घेत पीओपी वरील बंदी कायमची उठवली. यामुळे मोठा दिलासा मिळाला. गणेशमूर्ती व्यवसायासाठी स्वस्तात वीज सरकारने उपलब्ध करून द्यावी, ही विनंती आहे. – भरत दरेकर, गणेशमूर्ती कलाकार
शिळींब गावाला आता गणेशमूर्ती कारखान्यांमुळे गणपतीचे गाव ही नवीन ओळख मिळत आहे. सोबत, येथील कारागीर देखील चांगल्या प्रकारे गणपतीची निर्मिती, रंगकाम करीत आहेत. त्यामुळे दूरदूर हून खरेदीदार येथे येत आहे. सद्यस्थितीत येथील कुंभार बांधवांकडून जवळपास आठ हजारच्या आसपास गणेशमूर्ती निर्मिती व विक्री होत असून त्यातून अनेकांना रोजगार मिळत आहे. – निलेश दरेकर, श्रीराज आर्ट्स
गणेशमूर्तींच्या किमतीत यंदा तीस ते चाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे. कच्चा माल महागल्याने आणि पीओपी गणपतीस उशीरा मान्यता मिळाल्याने गणेशमूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. पीओपी पेक्षा शाडूच्या गणपतीच्या किमती दुप्पट ते अडीच पट आहेत. त्यामुळे ग्राहक वर्ग पीओपी गणपतीस पसंती देत आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे विसर्जनाची योग्य सोय केल्यास पीओपी गणेशमूर्तींसह हा गणपती सण साजरा करता येईल. यातून कुंभार समाज, कारागिर यांनाही दिलासा मिळाला आहे. – श्याम कुंभार, स्थानिक नागरिक
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा