Dainik Maval News : संवादक व शब्दांकन : संध्या नांगरे : ‘मे’ महिना अर्थातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. या मोठ्या सुट्टीमध्ये पालकांनी मुलांना छंद जोपासण्यासाठी, नवीन काही शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायचयं आणि उत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी आपल्यासमोर आदर्श व्यक्तिमत्व असायलाच हवीत. म्हणूनच एच. एच. कंपनीचे निवृत्त कामगार आणि ज्येष्ठ नाट्यकलाकार आणि नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी संवाद साधला आहे, प्रतिनिधी संध्या नांगरे यांनी. ही खास मुलाखत आवडी-छंद जोपासत आदर्श-ध्येयवादी व जीवनव्रती व्यक्तिमत्व कशी घडतात याचेच उदाहरण आहे.
प्रश्न : बालपणी नाट्यसंस्कार कसे झाले?
प्रकाशकाका : माझं शिक्षण पुण्यातच झालं. माझ्या आईवडीलांना कलांची फार आवड होती. वडील हार्मोनिअम फार छान वाजवायचे, भजनी मंडळामध्ये पेटी वाजवायला जायचे. लिखाण करायचे. आपल्या कलेचा वारसा आपण आपल्या मुलाला देऊ असं त्यांना वाटायचं. त्यांनीच लहानपणापासून माझ्यावर कलेचे संस्कार केले. वयाच्या सहाव्या वर्षी मी पहिली नाट्यछटा व्यासपीठावर मोठ्या प्रेक्षक वर्गासमोर सादर केली. माझं खूप कौतुक झालं. चौथीत असतानाच माझे रेडिओवर कार्यक्रम सुरु झाले. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये असताना आईनं शाळेत येऊन माझ्या अभिनय कौशल्याबद्दल शिक्षकांना सांगितलं. इयत्ता आठवीत असताना प्रथमच नाटकात मी राजकन्या झालो. माझी भूमिका उत्तम झाली. नंतर, गणेशोत्सवात मी नकलांचा कार्यक्रम पाहिला, त्याचं मला आकर्षण वाटलं आणि मीही वेगवेगळे आवाज काढण्याचा प्रयत्न केला. हळूहळू मला आवाज काढणं जमू लागलं व वर्गात मी ते करुन दाखवायचो. ते सर्वांना आवडलं. मग, एक तासाचा कार्यक्रम होईल एवढी जमवाजमव करुन मी विद्यार्थी असतानाच ‘नकलानगरी’ या नावाने माझा स्वतःचा पहिला कार्यक्रम केला.
प्रश्न : शालेय शिक्षणानंतर पुढचं शिक्षण आणि सोबतच कलेची साधना कशी सुरु ठेवली?
प्रकाशकाका : माझ्या नकलानगरी कार्यक्रमाचे प्रयोग पुढं वाढत गेले. मॅट्रीक नंतर रेडिओ दुरुस्तीचं काम केलं. पुढं, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनीत शिकाऊ उमेदवाराची संधी मिळाली. तिथे स्टायपेंड मिळायचा. तेव्हा वडिलांच्या सांगण्यावरून मी गाणं शिकण्यासाठी भास्कर संगीत विद्यालयात प्रवेश घेतला. गाणं आणि हार्मोनिअम शिकलो. तिथे वार्षिक कार्यक्रमात मी नाट्यछटा लिहिली, ती सर्वांना आवडली. मग, मला एक कार्यक्रम बसवावासं वाटलं. नकला आणि गाणी असा ‘संगीत नकलानगरी’ नावाचा कार्यक्रम बसवला. त्यात गायक-वादकांना सहभागी केलं. तिकीट लावून कार्यक्रम केले. या दरम्यान नाट्यदिग्दर्शक भालचंद्र पानसे याचं लक्ष माझ्याकडं गेलं. त्यांनी ‘आम्ही आपले खुळोबा खुळोबा’ या नाटकात मला मुख्य भूमिका दिली, त्याचे प्रयोग हाऊसफुल झाले आणि अशा पद्धतीने सन १९७२ ला मी व्यावसायिक बालनाट्यात पदार्पण केलं आणि माझी नाट्यकला जोपासत राहिलो.
प्रश्न : नोकरी आणि नाटक या दोन्हीचा मेळ कसा साधला?
प्रकाशकाका : सन १९७४ ला मी एच. ए. कंपनीमधून शिकाउमेदवारीचा काळ पूर्ण केला. तेव्हा मंदीमुळं नोकरी मिळत नव्हती आणि कलाही स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळं मी काव्योदय संस्थेत सहभागी व्हायचो. त्याचवेळी मी जाहिरातीचा व्यवसाय सुरु केला आणि वर्षभर चालवला. यात प्रिटींगचे ज्ञान मिळालं आणि मी काव्यसंग्रह काढला. बालनाट्य लिहावसं वाटू लागलं आणि ‘लबाड लांडगा’ हे बालनाट्य मी लिहिलं. सादरही केलं. १९७४ मध्येच मला नागपूरला डेअरीमध्ये नोकरीचं बोलावणं आल्यानं मी पुणे सोडून नागपूरला गेलो. तिथं मित्रानं तिथल्या बालनाट्य चळवळीशी जोडून दिलं आणि नोकरी सांभाळून मी नाट्यासाठी काम केलं, नकलानगरीचे प्रयोग केले.
पुढे मिरजेला बदली झाल्यावर नोकरी करत कॉलेजात शिक्षण घेऊ लागलो. नोकरीत आणि कॉलेजातही मी नाटकात भाग घेतला, नकलानगरीचा कार्यक्रम केला. दोन्ही ठिकाणी मी प्रसिद्ध झालो. कॉलेजचं एक वर्ष झालं आणि सन १९७७ मला हिंदुस्थान अँटीबायोटिक्स मधून कायम नोकरीचं बोलावणं आणि मी पुन्हा पुण्यात आलो. कंपनीत कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेत पारितोषिकं मिळवली. माझं नाट्यकलेचं काम पाहून अधिकारयानी मला कंपनीतील कामगारांसाठी स्पर्धांचं आयोजन करण्यास प्रोत्साहन दिलं, मी एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या. त्यात सहकारी कामगारांनी व कुटुंबियांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कंपनीच्या संघानं बाहेरील नाट्यस्पर्धेतही भाग घेतला. कंपनीचा कला विभाग मी सांभाळला.
त्याआधी, सन १९७५ मध्ये मुंबईला बालनाट्य प्रशिक्षकांसाठी असलेल्या शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. तिथं रत्नाकर मतकरी, भालबा केळकर, वंदना विटणकर, नाना जोगळेकर, दिनकर देशपांडे या दिग्गजांनी मार्गदर्शन केले. याच शिबिरात मी प्रतिज्ञा केली की…मी पुण्याला जाईन तेव्हा बालनाट्यासाठी काम करीन आणि गेली ४० वर्ष मी बालनाट्याच्या प्रचार आणि प्रसाराचं, प्रशिक्षणाचं कार्य करतो आहे.
प्रश्न : व्यावसायिक नाटकांकडे वळावसं वाटलं नाही का?
प्रकाशकाका : नाट्यछटा-बालनाट्य हीच माझी आवड आहे आणि १९७५ मध्ये बालनाट्यासाठी काम करण्याची मी प्रतिज्ञा घेतली होती. त्यामुळं मी बालनाट्याला वाहून घेतलं.
प्रश्न : नाट्यसंस्कार अकादमीची स्थापना कशी आणि कधी झाली?
प्रकाशकाका : सन १९७८ मध्ये आम्ही मित्रांनी ‘लबाड लांडगा’ या नाटयछटेचा प्रयोग केला. यावेळी आपण बालनाट्यासाठी संस्था स्थापन करुया अशी चर्चा झाली आणि आम्ही नाट्यसंस्कार अकादमीची स्थापना केली.
प्रश्न : नाट्यसंस्कार अकादमीचे उपक्रम कोणकोणते आहेत?
प्रकाशकाका : विद्यार्थ्यांसाठी नाट्यसंस्कार शिबिर आहे, मोठ्यांसाठी नाट्यकार्यशाळा आहे. माझे गुरु भालबा केळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाट्यछटा स्पर्धा गेली २५ वर्ष सुरु आहे. दिवंगत शिक्षक-नाट्यछटा लेखक दिवाकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाट्यछटा स्पर्धा सुरु आहेत. अलीकडेच पुणे विद्यापीठ व नाट्यसंस्कार अकादमी अशा संयुक्त विद्यमाने अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवत आहोत. या उपक्रमांना मान्यवर मार्गदर्शक येतात, अकादमीतील सहकारी अभिनय, नृत्य, रंगभूषा, प्रकाशयोजना अशा विविध विषयांचं मार्गदर्शन करतात.
प्रश्न : तुमच्या नाट्यछटा व पथनाट्य लेखनाविषयी
प्रकाशकाका : गेली ३५ वर्ष मी बालनाट्यासाठी काम करतोय. पण मी फार कमी नाट्यछटा लिहिल्या. काही पथनाट्य लिहिली, सहकारी तयार करुन ती सादर केली. माझी नाट्यविषयक व्याख्यानं असतात. कथाकथन करतो. ‘जादूचे घर’ नावाची माझी कथा फार गाजली.
प्रश्न : नाट्यप्रतिमा प्रकाशनाविषयी सांगा.
प्रकाशकाका : बालनाट्य चळवळ मी प्रशिक्षण, प्रयोग व प्रकाशन या तीन माध्यमातून राबवत आहे. बालनाट्य चळवळीत काम करणारया लेखकांसाठी नाट्यप्रतिमा प्रकाशन आहे. या प्रकाशनाद्वारे पालक व शिक्षकांनी लाहिलेली ४१ बालनाट्य प्रकाशित केली आहेत. ‘बहुरंगी नाट्यछटा’ हे पुस्तकही प्रकाशनानं प्रकाशित केले आहे. त्यात नाट्यछटा म्हणजे काय, ती कशी लिहावी, सादरीकरण कसं करावे, स्पर्धा कशा घ्याव्यात, परीक्षण कसं करावं ..असं सविस्तर सांगितलं आहे. हे पुस्तक राज्यभर पोचलं असून त्या त्या ठिकाणी स्पर्धा सुरु झाल्या आहेत. प्रकाशनामुळं बालनाट्य चळवळ राज्यभर रुजते आहे.
प्रश्न : तुमची स्वतःची आवडलेली भूमिका कोणती?
प्रकाशकाका : माझं ‘मी नकलाकार ‘ नावाचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. खरया आयुष्यात मी विविध नकला केल्या. त्यातली नाट्य प्रशिक्षकाची नक्कल लोकांना फार आवडली. नाटकामध्ये सांगायचं तर ढब्बू ढोल रिमोट गोल या बालनाट्यातील बाबांची भूमिका मला फार आवडते. अनेक वर्ष मी ही भूमिका साकारतोय.
प्रश्न : वर्गनाट्य व अभ्यासनाट्य या काय संकल्पना आहेत?
प्रकाशकाका : राज्यशासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. इथं काम करताना आम्हाला लक्षात आलं की आपल्या अभ्यासक्रमात नृत्य-नाट्य-गायन-वादन-चित्र- शिल्प अशा कलांना फारसं महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळं आम्ही कला प्रशिक्षणासाठीची पुस्तकं तयार केली. ती पुस्तकं जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत दिली, शिक्षकांचं प्रशिक्षण घेतलं. शिक्षकांचं असं म्हणणं होतं की, तालुक्यात नाट्यगृह नाहीत, मग नाटक शिकवून काय उपयोग? त्यावेळी मला वर्गनाट्य ही कल्पना सुचली आणि मी ती अभ्यासक्रमात मांडली, सर्वांना आवडलीही. त्यानंतर अभ्यासनाट्य ही संकल्पना मांडली. एखादा अवघड वाटणारा विषय नाट्यातून शिकवला गेला तर ते अध्ययन व अध्यापन प्रभावी होईल, रंजक होईल ..अशी ही संकल्पना आहे. पुढंही या संकल्पनेवर काम करायचं आहे.
प्रश्न : बालरंगभूमी परिषदेच्या कामाविषयी सांगा
प्रकाशकाका : बालरंगभूमी परिषद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न आहे. बालरंगभूमी परिषदेच्या स्थापनेला आठ वर्ष झाली. परिषदेच्या १७ जिल्ह्यात शाखा आहेत. त्या शाखा त्या ठिकाणी लहान मुलांसाठी नृत्य, नाट्य स्पर्धा घेतात. बालनाट्य संमेलनाचे नियोजन असते.
प्रश्न : शाळांच्या स्नेहसंमेलनात नाट्यछटा सादर होताना दिसत नाहीत, हे चित्र कसं बदलेल?
प्रकाशकाका : शाळांच्या स्नेहसंमेलनात नाट्यछटा सादर होत नाहीत कारण नाटक बसवायला वेळ नाही. हे चित्र निराशाजनक आहे. पण शाळेबाहेर नाट्यकलेचं महत्व अनेक पालकांच्या लक्षात आलंय म्हणून ते आपल्या मुलांना शिबिरात पाठवतात आणि गावाकडे मोफत नाट्यवर्ग असले तरी पालक मुलांना पाठवत नाहीत हे दुर्दैव आहे. हे चित्र बदलायचं असेल तर बालनाट्य चळवळ सर्वदूर पोचवली पाहिजे. त्याद्वारे नाट्यशास्त्राचं महत्व शिक्षक आणि पालकांपर्यंत पोचेल. शिक्षण अधिकारयानीही यात लक्ष घालण्याची गरज आहे. नाट्यकला ही मुलांच्या व्यक्तीमत्वाचा विकास करणारी आहे.
प्रश्न : दूरचित्रवाणी वाहीन्यावर लहान मुलांसाठी नाट्यविषयक कार्यक्रम नाहीत
प्रकाशकाका : टिव्हीवर बालनाट्याचे कार्यक्रम नाहीत ही खंत आहे. बालचित्रवाणीचं काम बंद करुनही सरकारनं चूक केली आहे.
दूरचित्रवाणी वाहीन्यांसाठीचं धोरण आणि तिथले कार्यक्रम अधिकारी दोन्ही बालनाट्याला वाव देणारे हवेत. राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेतील नाट्यछटा टिव्हीवर दाखवायला हव्यात.
प्रश्न : भविष्यात बालनाट्य चळवळ पुढं नेण्याचं नियोजन काय?
प्रकाशकाका : भविष्यात माझ्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणं फक्त नट घडवण्यासाठी नाही तर मुलांचं व्यक्तीमत्व घडवण्यासाठी माझं बालनाट्य चळवळीचं कार्य सुरु राहिल. त्यात अभ्यासनाट्य संकल्पना प्रत्यक्ष राबवण्यास प्राधान्य देणार आहे. बालरंगभूमी परिषदेचं काम आगामी काळात मोठं व भरीव करायचं आहे.