Dainik Maval News : पिंपरी – चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या व भविष्यकाळातील पाण्याची गरज लक्षात घेता शहरासाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षणाला मंजुरी देण्याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची आमदार लांडगे यांनी मुंबईत भेट घेतली. यावेळी पिंपरी-चिंचवडचा पाणी पुरवठा आणि नवीन जलस्त्रोत निर्मिती याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. शहरातील वाढते नागरीकरण आणि पाण्याची मागणी याचा विचार करता भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त जलस्त्रोत निर्माण करण्याची नितांत आवश्यकता असून, मुळशी धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आरक्षीत करावे, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला आहे.
दरम्यान, पुण्यात कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक आमदारांनी पुण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षणाबाबत मागणी केली आहे. त्यासंदर्भात कालवा समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याला अनुसरून, पिंपरी-चिंचवडसाठीसुद्धा मुळशी धरणातून पाणी आरक्षीत व्हावे, याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती आमदार लांडगे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला सध्या पवना धरण आणि आंद्रा, भामा- आसखेड धरणातून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अद्याप सुरू नाही. तसेच, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचा दुसरा टप्पा अद्याप कार्यान्वयीत झालेला नाही. सबब, शहरातील पाण्याची मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण व्यस्त असून, सोसायटीधारकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. परिणामी, पाणी पुरवठा आणि टंचाई ही समस्या संवेदनशील बनली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक