Dainik Maval News : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आणि निकाल शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडावा यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 101 गुन्हेगारांना सात दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार केले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. अनेक उमेदवारांनी ही निवडणूक करो या मरो अशी घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद अशा सर्व अस्त्रांचा वापर होण्याची शक्यता असते. दरम्यान निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी ही विशेष खबरदारी घेतली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत पिंपरी, चिंचवड, भोसरी हे तीन मतदारसंघ तर खेड, खडकवासला, मुळशी, मावळ या मतदारसंघाचा काही भाग येतो. सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मावळ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची कुंडली काढण्याचे काम गुंडा विरोधी पथकाकडे सोपविले. गुंडा विरोधी पथकाने चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या 101 गुन्हेगारांची कुंडली काढली.
त्यानुसार या गुन्हेगारांना 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 24 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मावळ तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना धमकावणे तसेच आपल्या दहशतीचा मतदान प्रक्रियेवर प्रभाव पाडणे, असे संभाव्य प्रकार टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये तळेगाव दाभाडे 56, तळेगाव एमआयडीसी 3, देहूरोड 30, शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 12 गुन्हेगारांचा समावेश आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, निवडणुकीत कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करू नये. जर कोणी नागरिकांना धमकावत असेल तर पोलिसांना तात्काळ माहिती द्या. संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
राष्ट्रीय कर्तव्याचा अधिकार शाबूत
एरिया बंदी केलेल्या गुन्हेगारांना मतदानाच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. 20) सकाळी सात ते सकाळी दहा या कालावधीत मतदान करता येणार आहे. मतदान करण्यासाठी येताना त्यांना स्थानिक पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असली तरी त्यांचा राष्ट्रीय कर्तव्याचा अधिकार पोलिसांनी शाबूत ठेवला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी आंबेडकरी जनतेला सर्वाधिक न्याय दिला – सूर्यकांत वाघमारे
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदार ओळख चिठ्ठी वितरणास सुरुवात । Maval Vidhan Sabha
– खून प्रकरणी तिघांना अटक ; मावळ तालुक्यातील नानोली येथील प्रकार । Maval Crime