वैष्णवांची दिवाळी. महाराष्ट्रात वारी परंपरा सुरु असल्याने प्रत्येक घराघरात या विषयी आत्मीयता आणी उत्कंठा असते. वारकरी संप्रदयाच्या दृष्टीने तर भगवंताला प्रत्यक्ष अलिंगन देण्याच्या योग. महाराष्ट्रातील पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ. प्रत्यक्ष श्रीहरी भगवान येथे आत्मीयता आणी उत्कंठा अठ्रठावीस युगे आपल्या भक्तांसाठी विटेवर उभे आहेत. अनेक संतानी आपल्या अभंगामधून या दिवसाचे महात्म्य वर्णन केलेले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस” या परंपरेत अखंड वारीची परंपरा सुरु आहे. लाखो भक्त प्रत्यक्ष यात सहभागी होत असतात. जगाच्या पाठीवरील एकमेव अव्दितीय उत्सव जो सुमारे तीन आठवडे सुरु असतो. 300 किमीचा पायी प्रवास अबालवृध्द मोठया आनंदाने विना कष्टाने पार पाडत असतात. या आषाढीचे महत्वही आगदी पुराणकाळापासून आहे.
खरं तर ही “देवशयनी एकादशी” म्हणून ओळखली जाते, भारतभर या एकादशीचे महत्व आहे. ही एकादशी “महा एकादशी”, “थोली एकादशी” , “हरिशयनी एकादशी” , “पदम्नाभ शयनी एकादशी”, आणि “प्रबोधनी एकादशी” या नावाने ओळखली जाते. आषाढ महिन्यात येते म्हणून त्यास “आषाढी” ही म्हटले जाते. ( Devshayani Ashadhi Ekadashi History Features and Significance )
“आषाढी-कार्तिकी भक्त जन येती” असेच वर्णन आरती मध्ये केलेले दिसते. याची कथा ब्रह़मवैवर्त पुराणात विस्ताराने आली आहे. या मध्ये या दिवशी एक व्रत करावे, ज्या मुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे व्रताचे महात्म सांगितले आहे. आषाढ शूक्ल एकादशी पासून चातृर्मास सुरु होतो. चार्तमास म्हणजे चार महिन्याचा एकत्रीत कालावधी यात भगवान विष्णु क्षीरसागरात शयना साठी जातात. भगवान शयन करतात म्हणजे काय करतात? या विषयी खरोखर विचार करण्याचा सारखा आहे. देव जागा आहे, या भावनेतून आपण निश्चीत रहातो.
“आता देव शयन करणार आहे, त्यामुळे आता आपण आपला निवांतपणा सोडून कर्म करावयास हवे” हा संदेश यातुन धर्माने दिला आहे. आषाढ पासून पावसाळा सुरु होतो. भारतीय जीवन हे शेतीवर आधारीत जीवन आहे. हे चार महिने शेती करण्याचे प्रमुख महिने आहेत. “आता देव शयन करीत आहेत त्यामुळे भक्ता तु जागा (सावध) राहा, आता तुझे कर्म कर” असा संदेश या देवशयनी एकादशीपासून दिला जातो.
शेतप्रधान संस्कृतीमध्ये पावसाचे महात्व आहे. शेतीत पिकले तरच पुढील जीवन सुखकर होणार आहे. त्यामुळे या कर्माची सुरुवात भक्तीमार्गातुन करुन त्यातून शक्ती (समृध्दीकडे) जाण्यासाठीच धर्माने काही रुढी परंपरा सुरु केल्या. पूर्वी आजच्या सारखी कॅलेंडर नव्हती. त्यामूळे तिथीवरुनच सर्व व्यवहार होत होते. प्रत्येक महिन्याच्या प्रमुख तिथीसाठी एक खास सण तयार केला गेला. जो त्या कालावधीचे प्रतिनिधीत्व करीत होता.
वारीच्या निमित्त एकमेंकाच्या भेटी होत असत त्यातून बी – बियाणांची देवाणघेवाण होत असे. एकसंघ समाज एकमेंकासाठी अपोआप एकत्र जमत असे. अनेक समस्या या निमित्ताने निराकरण होत असत. कित्येक सोयरीक, संबंध जुळले जात असत, “भक्ती आणी कर्म” यांचा एकत्रित मिलाप या निमित्ताने आपणांस पहावयास मिळतो. वारीकडे आपल्या पूर्वजांच्या दुरदृष्टीच्या विचारांचे प्रतिक म्हणूनही आपण या उत्सवाकडे पाहिले पाहिजे.
लेखक – अजित देशपांडे ( संत विचार अध्यासन )
अधिक वाचा –
– ढाक भैरी गडावर वाट चुकलेल्या पर्यटकांच्या शोधमोहिमेचा थरार!! मुसळधार पाऊस, काळाकुट्ट अंधार अन्…
– लोणावळा शहराजवळील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी वर्षाविहारासाठी जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, थेट 144 (1) केलाय लागू