Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कार्ला–खडकाळा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आणि पीएमआरडीएच्या मा. सदस्या दिपाली दीपक हुलावळे तसेच खटकाळा पंचायत समितीचे उमेदवार समीर जाधव यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्याला कामशेत परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला. कुसगाव खुर्द, येवलेवाडी, चिखलसे व आहिरवडे या गावांमध्ये त्यांचा प्रचार दौरा उत्साहात पार पडला.
या चारही गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) व स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी (SRP) यांच्या युतीचे उमेदवार असलेल्या दिपाली हुलावळे व समीर जाधव यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावोगावी रांगोळ्या काढून, फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामस्थांनी या दोन्ही उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले. महिला भगिनींनी औक्षण करून आपला पाठिंबा जाहीर केला.
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून या सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणाऱ्या या लोकनेत्याचे शिलेदार म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात असलेल्या दिपाली दीपक हुलावळे व समीर जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी ग्रामदैवतांच्या मंदिरासमोर व्यक्त केला.
कामशेत शहराच्या लगत असलेली ही गावे अनेक वर्षे विकासापासून वंचित होती. मात्र आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून रस्ते, पिण्याचे पाणी, गटारी, समाजमंदिरे आदी मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. काही कामे पूर्ण झाली असून काही सुरू आहेत, तर उर्वरित कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. गावोगाव विकासाच्या योजना पोहोचवणाऱ्या या लोकनेत्याच्या विश्वासू सहकाऱ्यांना निश्चितच मोठे मताधिक्य देऊ, असा ठाम विश्वास कुसगाव खुर्द, येवलेवाडी, चिखलसे व आहिरवडे येथील प्रमुख मंडळी व महिला भगिनींनी व्यक्त केला.
दिपालीताई हुलावळे व समीर जाधव हे या भागाच्या भविष्यातील विकासरथाची महत्त्वाची चाके असून, ही चाके निश्चितच या भागातून मोठे मताधिक्य घेत आपली घोडदौड सुरू ठेवतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. प्रचारादरम्यान नागरिकांनी विविध समस्या उमेदवारांच्या निदर्शनास आणून दिल्या. येणाऱ्या काळात या सर्व समस्या सोडवून शाश्वत विकास साधण्याचा, तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचा शब्द दोन्ही उमेदवारांनी नागरिकांना दिला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– चांदखेड पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुनिता मनोज येवले यांच्या प्रचारार्थ आमदार सुनील शेळके यांची रॅली
– साहेबराव कारके हे मावळ पंचायत समितीचे उपसभापती होणार – आमदार सुनील शेळके
– कुसगांव बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ, आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भव्य रॅली
– कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !