Dainik Maval News : प्रशासनाने जनतेच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करावे. लोकभावनेचा आदर करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ आणि विकासाची गंगा घरोघरी पोहोचवावी, असे आवाहन समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांनी केले.
टाकवे बुद्रुक-वडेश्वर जिल्हा परिषद गटात पुणे जिल्हा परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अजित जनसंवाद विकास अभियाना’त ते बोलत होते. यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधत विविध गावांतील पाणीपुरवठा, रस्ते, स्मशानभूमी, घरकुल, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न जाणून घेण्यात आले.
यावेळी बोलताना बडेकर म्हणाले की, गावांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून समाजमंदिरांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या माध्यमातून घरोघरी सौर चुली पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विकासकामे करताना केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष जनतेच्या गरजा लक्षात घेणे आवश्यक आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना बडेकर म्हणाले, “मी दादांच्या रक्ताचा नाही, पण दादांच्या विचारांचा वारसदार आहे. दादांनी केलेल्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मी सातत्याने काम करत राहणार आहे.”
पाणीटंचाईपासून स्मशानभूमीपर्यंत नागरिकांनी मांडले प्रश्न
जनसंवादादरम्यान नागरिकांनी गावोगावी भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचला. अंकुश आंबेकर, काळूराम वाडेकर, नारायण ठाकर, सुरेश चौधरी, आशा मोरमारे, दिलीप आंबेकर आणि तुषार जगताप यांनी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची गंभीर समस्या मांडली. दवणेवाडीत स्मशानभूमी नसल्याने मृत्यूनंतरही ग्रामस्थांच्या अडचणी संपत नसल्याची व्यथा नागरिकांनी व्यक्त केली.
आदिवासी बांधवांना हक्काची घरकुले मिळावीत, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणीही अनेकांनी केली. इंद्रायणी आणि पवना नदीच्या पुनरुज्जीवनाबाबत तसेच लोणावळा-पुणे रेल्वेच्या तिसऱ्या मार्गिकेसंदर्भात करण्यात आलेल्या घोषणांची प्रत्यक्ष पूर्तता कधी होणार, असा सवाल माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी यांनी उपस्थित केला.
कान्हे ते खांडी रस्त्यासाठी भूसंपादन होत असलेल्या जमिनींचा योग्य मोबदला संबंधित शेतकऱ्यांना मिळावा, तसेच जिल्हा परिषदेच्या काही ठेकेदारांकडून कामे करताना अरेरावी केली जात असल्याचा आक्षेप साहेबराव टेमघिरे यांनी नोंदविला. शासकीय योजनांच्या माध्यमातून गावातील विकासकामांना अपेक्षित गती मिळत नसल्याची बाब काळूराम वाडेकर यांनी मांडली.
भोयरे येथील ठाकरवस्तीतील अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण करावीत आणि पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच बळिराम भोईरकर यांनी केली. भारूड कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी गोपाळ पवळे यांनी केली. पंचायत समिती सदस्या आशा मोरमारे यांनी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. तर दिलीप आंबेकर यांनी नळाला नियमित पाणी येत नसल्याची आणि गावातील कचरा व्यवस्थापनाची समस्या मांडली.
विकासकामांसाठी निधी मिळावा; दिलेले शब्द पाळण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले, “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर निधीअभावी विकासकामे रखडता कामा नयेत. निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेले शब्द पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक विकासनिधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. जनसंवाद आणि जनता दरबारात नागरिकांकडून वारंवार त्याच समस्या मांडल्या जातात. त्यामुळे त्या केवळ ऐकून न घेता प्रत्यक्ष सोडविण्याची जबाबदारी आपली आहे.”
या अभियानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके, गटविकास अधिकारी सेवक थोरात महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर, तालुका कार्याध्यक्ष नामदेव ठुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष तानाजी पडवळ, नितीन मुऱ्हे, माजी अध्यक्ष संदीप आंद्रे, माजी उपसरपंच स्वामी गायकवाड, भारत आडिवळे,टाकवे शहर अध्यक्ष बाबुशेठ ओसवाल,प्रशांत जाधव, विक्रम हेमाडे, नवनाथ आंबेकर, सोमनाथ राक्षे यासह अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत लष्करी यांनी केले, तर जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळाले; आता मांडलेल्या समस्यांचे प्रत्यक्ष निराकरण होऊन विकासकामांना गती मिळणार का, याकडे टाकवे-वडेश्वर गटातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
