Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे घडलेली दुर्घटना आणि त्यात झालेले ४ पर्यटकांचा मृत्यू हे अतिशय दुर्दैवी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाज आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण संदीप गिल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकरी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.
- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, आपत्ती व्यवस्थानाच्यादृष्टीने जिल्ह्यातील धोकादायक तसेच अतिधोकादायक जुने पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलके, रेल्वे पुलाचे येत्या ७ दिवसात बांधकाम तपासणी (स्ट्रॅक्चरल ऑडिट) करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सादर करावा, परिक्षणात धोकादायक असलेले पुल, साकव, इमारती, वाडे, जाहिरात फलके काढून घ्यावेत, कार्यवाही करतांना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील धोकदायक ठिकाणांची पाहणी करुन जागा निश्चिती करावी. त्याची विविध माध्यमांद्वारे व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. पावसाळ्यात धोकादायक नसलेल्या तथापी पाणी साचणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट करावे. पर्यटकांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने त्यांना धोकादायक पयर्टनस्थळी जाण्यास प्रतिबंधित करावे तसेच पर्यटनस्थळी व रस्त्यावर दिशादर्शक फलके लावावीत, याठिकाणी वन व्यवस्थापन समितीची मदत घ्यावी, आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्त करावी. धोकादायक ठिकाणी मॉकड्रील आयोजित करावे. तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवावेत.
मान्सून काळात संभाव्य पुरपरिस्थिती लक्षात घेता पूरबाधित गावांची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नदी पात्रातील पूररेषेखाली येणाऱ्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी. आपदा मित्रांना आवश्यतेप्रमाणे पायाभूत सूविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची कार्यशाळा आयोजित करावी. चांगले काम करणाऱ्या आपदा मित्रांना सन्मानित करावे.
आरोग्य विभागाने रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे साठा तयार ठेवावे. गावातील रेनगेज स्टेशनची सद्यस्थिती पडताळून कार्यान्वित असल्याची खात्री करावी. गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व जीवरक्षक पथकाची नियुक्ती करावी. महावितरणने वीजेचे खाब, रोहित्र, तारांची तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
- जिल्ह्यात दरडप्रवण क्षेत्रातील गावातील नागरिकांना पूर्वसंकेत ओळखण्यासोबतच खबरदारीच्या उपाययोजनांबाबत स्थानिक प्रशासनाने माहिती द्यावी. संबंधित विभागाने जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, नागरिकांना सोप्या भाषेत परंतू अद्ययावत माहिती देण्याची कार्यवाही करावी. आपत्तीच्या काळात नागरिकांना सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती द्यावी. जिल्ह्यात मागील काळात घडलेल्या घटनेच्यावेळी झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करावी, त्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात समावेश करावा.
येत्या काळात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे, यापार्श्वभूमीवर रत्याच्याकडेला असलेली अनाधिकृत जाहिरात फलके तसेच धोकदायक वृक्षे काढून घ्यावीत, सर्व रस्त्यांना बाजुला पट्टे भरुन घ्यावेत. रस्त्यावर वाहतूकीस होणाऱ्या अडथळा लवकरात लवकर करण्याची कार्यवाही करावी,असे निर्देश डुडी यांनी दिले.
- सीईओ गजानन पाटील म्हणाले, पालखी सोहळ्यासोबत आपत्ती व्यवस्थापनाचेही नियोजन करावे. जिल्ह्यातील पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलके आदींची संख्या विचार घेता स्ट्रॅक्चरल ऑडिट करण्याकरीता पॅनेल तयार करुन त्यांच्याकडून स्ट्रॅक्चरल ऑडिट करण्याबाबत विचार करावा. पावसाळ्यात अहिल्यानगर ते कल्याण महामार्गावर जिल्ह्यात अपघाताची संख्या तसेच नाणेघाट, जीवधन किल्ला, भीमाशंकर येणाऱ्या पर्यटकांची संख्या विचारात घेता उपाययोजना कराव्यात, असेही पाटील म्हणाले.
पोलीस अधीभक संदीप सिंह गिल म्हणाले, जिल्ह्यातील धोकदायक ठिकाणांची पोलीस प्रशासनाच्यावतीने पाहणी करण्यात करुन जिल्हा प्रशासनासमवेत आवश्यतेप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहे. आवश्यतेनुसार आपदा मित्रांची संख्येत वाढ करण्यात यावी. स्थानिकांशी समन्वय साधण्याकरीता दर १५ दिवसांनी बैठकांचे आयोजन करावे, असेही गिल म्हणाले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी, आरोग्य, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, नगर परिषद, पुणे प पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय, जिल्हा अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महावितरण, वन विभाग, वन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, भारतीय हवामान विभागासह सर्व संबंधित विभागांचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat
– प्रेमसंबंधातील वादातून प्रेयसीकडून तीस वर्षीय प्रियकराचा खून ; इंदोरी, मावळ येथील घटना । Maval Crime
– चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम


