Dainik Maval News : पवना कृषक सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या एका उमेदवाराचे बुधवारी (दि.१२) निधन झाले. यामुळे रविवारी (दि. २३ फेब्रुवारी) होणाऱ्या पवना कृषक सहकारी संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांनी दिली आहे.
मंजूर निवडणूक कार्यक्रमानुसार ह्या निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक १६ जानेवारी रोजी सुरू झाला. यात १० फेब्रुवारी रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी सर्वसाधारण गटातून रमेश गणपत माळवदकर यांचे नाव अंतिम उमेदवारांच्या यादीमध्ये समाविष्ठ होते. दरम्यान, सर्वसाधारण खातेदार कर्जदार मतदारसंघातील उमेदवार रमेश गणपत माळवदकर यांचे बुधवारी (दि.१२) आकस्मिक निधन झाले. याबाबत ग्रामपंचायत शिवणे यांच्याकडील मृत्यू प्रमाणपत्र निवडणूक अधिकारी यांना प्राप्त झाले आहे.
- महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) २०१४ मधील नियम ३१ प्रमाणे असलेल्या तरतूदीनुसार, मतदानपुर्वी एखादा उमेदवार मरण पावला तर निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, पवना कृषक निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी राकेश निखारे यांनी माळवदकर यांच्या मृत्यूबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला असून पवना कृषक सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, तसेच नवीन निडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करणार असल्याचे निखारे यांनी सांगितले आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीची नवीन तारीख घोषित करून निवडणुकीच्या संदर्भातील सर्व कामकाजास नव्याने प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या इतर सर्व उमेदवारांचे अर्ज कायम राहतील. त्यांना नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची नोटीस दिली असेल. त्यांना पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. तसेच सध्या जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत, त्यांना आता नवीन प्रक्रियेत अर्ज मागे घेता येणार नाहीत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निखारे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ