दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यात गेली चार ते पाच दिवसांपासून बिगरमोसमी (अवकाळी पाऊस) पावसाचे वातावरण आहे. तसेच गुरुवारी (दि. २ एप्रिल रोजी) दुपारी व सायंकाळच्या सुमारास मावळ तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासहीत अवकाळी पाऊस बरसला.
पवन मावळ विभागातील शिवणे भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी चंद्रकांत गणपत कुंभार यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांनी शेतात लावलेला फळभाजीपाला, भाजीपाला याचे हातातोंडाशी आलेले पिक या अवकाळी पावसाच्या फेऱ्यात जवळपास उद्धवस्त झाले असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्याला आर्थिक आधार द्यावा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत कुंभार यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना दिली.
