Dainik Maval News : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रूक येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ’सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीवर धाड टाकून प्रशासनाने तब्बल ३१ कोटी ६७ लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर आणि प्रतिबंधित सुगंधी हुक्का तसेच तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई केली. यात ५.४८ लाख किलो वजनाचा प्रतिबंधित फ्लेवर्ड हुक्का आणि तंबाखूजन्य साठा जप्त केला आहे. तपासणीदरम्यान या साठ्यामध्ये ११६ प्रकारचे तयार पदार्थ, १८ प्रकारचा कच्चा माल आणि १८ प्रकारचे विविध फ्लेवर्स आढळून आले आहेत.
यामध्ये मानवी आरोग्यास घातक असलेल्या ग्लिसरीन, फ्रुक्टोज आणि निकोटीनचा वापर करून ‘Afzal Authentic Flavoured Hookah’ या नावाने छुप्या पद्धतीने उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वडगाव पोलिसांनी कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक अनिल कुमार चौहान यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील नार्कोली येथे ३१ डिसेंबर रोजी दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना या विशेष पथकाला टाकवे येथील कंपनीचा सुगावा लागला होता. या प्रकरणी कंपनीचे संचालक आसिफ फाजलानी आणि फैजल फाजलानी यांच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई भंडाऱ्याचे सहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे आणि सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या नेतृत्वाखालील विशेष भरारी पथकाने केली. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता जयंत टोणपे यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे.
मानवी आरोग्यास घातक आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या या पदार्थांचे उत्पादन केल्यामुळे एफडीएने संपूर्ण आस्थापना सील केली आहे. मावळ परिसरात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ, फडणवीस सरकारचा निर्णय
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला

