Dainik Maval News : मावळ तालुक्यातील लोणावळा शहराजवळील निसर्गरम्य राजमाची गाव तसेच परिसरातील वनहाटी वस्ती, उधेवाडी व फणसराई या आदिवासी व दुर्गम गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज पोहोचणार आहे. आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे हा ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात येत आहे.
आजवर या गावांमध्ये वीज सुविधा नसल्यामुळे नागरिकांना अंधारातच जीवन जगावे लागत होते. मात्र आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागांतर्गत ४ कोटी ६४ लाख रुपयांचा वीजपुरवठा प्रकल्प मंजूर झाल्याने या परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र आमदार सुनील शेळके यांनी या दुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने घेत सातत्याने पाठपुरावा केला. परंतु विद्युत कामासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच कामासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली. त्याला यश येत आता या भागात वीज पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
या निर्णयामुळे राजमाची परिसरातील घराघरात वीज पोहोचणार असून शिक्षण, आरोग्य, दळणवळण, लघुउद्योग तसेच पर्यटनाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. अंधारात जगणाऱ्या नागरिकांसाठी हा बदल जीवनमान उंचावणारा ठरणार असून आधुनिक सुविधांचा लाभ त्यांना मिळणार आहे.
विशेष म्हणजे विधानसभेच्या प्रचाराच्या काळात आमदार सुनील शेळके यांची कन्या श्रद्धा शेळके यांनी येथील नागरिकांना दिलेला शब्द आज पूर्ण होत आहे. “जोपर्यंत तुमच्या भागात वीज आणणार नाही, तोपर्यंत इथे परत येणार नाही,” असे त्यांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयासाठी जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच आदिवासी विकास विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. आमदार सुनील शेळके यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टीमुळे राजमाची परिसर अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत असून हा क्षण येथील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने सुवर्णक्षण ठरत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक
