Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक गणेश काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिवाजी आगळे, बाबा मुलानी आणि भाजपाकडून सूरज सातकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर, विरोधीपक्षनेते पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष भेगडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत, आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुती झाली होती. त्यात नगराध्यक्षपदी भाजपाचे संतोष हरिभाऊ दाभाडे यांची निवड झाली. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, भाजपचे १० तर एक अपक्ष असे एकूण २८ नगरसेवक विजयी झाले आहेत.
दरम्यान उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.१३) नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या हेमलता खळदे, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, भाजपाचे गटनेते इंदरमल ओसवाल यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
सर्व निवडी झाल्यानंतर आमदार सुनील शेळके, बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सुधाकर शेळके, भाजपाचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, कृष्णा कारके, सुरेश धोत्रे, दर्शन खांडगे, अनिकेत भेगडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष काकडे आणि तसेच नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
गणेश काकडे यांनी यापूर्वी तीन वेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेते व उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. महायुतीतील ठरावानुसार अडीच वर्षांनंतर त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. स्वीकृत सदस्यपदी निवड झालेले आगळे, मुलानी व सातकर हे तिघेही आपापल्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “नगरसेवक, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष होण्याचा मान मतदारांनी तुम्हाला दिला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून तळेगाव दाभाडे शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करावे.” नगराध्यक्ष संतोष दाभाडे म्हणाले, “शहराच्या विकासाठी सर्वांना बरोबर घेऊन शहराचे मूलभूत प्रश्न सोडवले जातील.”
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
– नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव-कातवी मधील ठाकर समाजातील १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप
– भाजपाकडून ‘भयमुक्त मुंबई’चा नवा अध्याय : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आणि मुंबईकरांचा मोकळा श्वास
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
