Dainik Maval News : जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची तपोभूमी असलेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमीच्या पावन पर्वानिमित्त भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कार्यक्रमस्थळी मंडप उभारणीच्या कामाला आज (दि.५) विधिवत प्रारंभ झाला.
कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर जन्मोत्सव, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सव, तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष या ऐतिहासिक व अध्यात्मिक पर्वांचे औचित्य साधून हा माघ शुद्ध दशमी सोहळा यंदा भव्य-दिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे.
हा सोहळा शुक्रवार, दि. २३ जानेवारी ते शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्यावरील १०० एकर क्षेत्रावर भव्य पटांगणात संपन्न होणार आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू परमपूज्य ह.भ.प. मारुतीबाबा कुऱ्हेकर महाराज यांच्या शुभाशीर्वादाने, तसेच वारकरीरत्न ह.भ.प. छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. आयोजनात सकल पुणे जिल्हा वारकरी संप्रदाय, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व माघ शुद्ध दशमी सोहळा समिती सहभागी आहेत.
कार्यक्रमांची रूपरेषा (या कालावधीत दररोज)
– पहाटे काकडा आरती व अभिषेक
– ज्ञानेश्वरी व गाथा पारायण
– दुपार व रात्री कीर्तन महोत्सव
– संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा
– भारुड, संगीत भजन व जागर
असे विविध सांप्रदायिक कार्यक्रम होणार आहेत. लाखो भाविकांसाठी दररोज दिवसभर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव उर्फ बाळासाहेब काशिद यांनी दिली.
मंडप उभारणीचे स्वरूप
मुख्य मंडप : ४०० x २०० फूट
ज्ञानेश्वरी व गाथा पारायणासाठी : १०० x २०० फूट आकाराचे दोन स्वतंत्र मंडप
महाप्रसाद मंडप : १०० x ३०० फूट
स्वयंपाकगृह : ६० x ३०० फूट
शुभारंभ सोहळा
मंडप उभारणीच्या कार्याचा शुभारंभ संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, ह.भ.प. शंकर महाराज मराठे, ह.भ.प. रवींद्र महाराज ढोरे तसेच नेवाळे मंडपचे मालक महादू नेवाळे यांच्या शुभहस्ते एका खांबाची विधिवत पूजा करून करण्यात आला. यावेळी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त, माघ शुद्ध दशमी सोहळा समितीचे पदाधिकारी व वारकरी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ, फडणवीस सरकारचा निर्णय
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
