कळकराई ते मोग्रज या रस्त्याला वनविभागाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे मावळातील कळकराई ग्रामस्थांच्या नशिबी असलेली पायपीट आता थांबणार आहे. वनविभागाच्या निर्णयानंतर कळकराईकरांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच ही गोड बातमी मिळाल्याने ग्रामस्थांचा पाडवा खऱ्या अर्थाने गोड झाला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मावळ तालुक्यातील कळकराई येथे नवीन जोडरस्ता बांधणे (कळकराई -मोग्रज) करिता मौजे मोग्रज (तालुका- कर्जत, जिल्हा- रायगड) येथील राखीव क्षेत्र हे मोग्रज ग्रामपंचायत हद्दीत येत आहे. कळकराई – मोग्रज या आदिवासीवाडी रस्त्याकरिता लागणाऱ्या वनक्षेत्राचे परिवर्तन करण्यासाठी मागणी करणारा दावा मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव शिफारसींसह सदर कार्यालयात सादर करण्यात आला होता, तो 8 एप्रिल 2024 रोजी मंजूर झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ( Good News Mograj Karjat to Kalkarai Maval road permission from forest department )
मागील अनेक वर्षांपासून केलेल्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. अलिबाग (रायगड) वन विभागाने हा प्रस्ताव मंजूर केला. महाराष्ट्र शासन वन विभाग उपवनसंरक्षक – अलिबाग, वन परिक्षेत्र अधिकारी कर्जत पूर्व यांनी सहाय्यक वनसंरक्षक पनवेल यांच्यामार्फत अनुसूचित जमाती व अन्य पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारीत नियम 2012 मधील कलम 3(2) चे अधीन राहून हा आदेश दिला.
आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नामधून कळकराई – मोग्रज या जोड रस्त्यासाठी निधीची तरतूद करून देण्यात आलीये. सदरच्या रस्त्यासाठी वनविभागाची परवानगी मिळण्याकरिता उपवनसंरक्षक, पुणे बांधकाम विभाग, वडगाव मावळ अभियंता, वनपाल यांचाही मोलाचा वाटा राहिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि धन्यवाद मानले. भरत साबळे, सचिन तळपे, सूर्यकांत तळपे, चंद्रकांत कावळे, सखाराम कावळे, गावातील तरुण मंडळ आणि ग्रामस्थ यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
अधिक वाचा –
– मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, आतापर्यंत 14 हजार तक्रारींचे निवारण, पुणे जिल्हा आघाडीवर
– गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाजे गावातील छत्रपती शिवरायांच्या 16 फुटी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; संपूर्ण गाव झालं शिवमय
– ‘जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केलाय’