Dainik Maval News : जगभरात आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रामुख्याने सन्मानित करण्यात येते. अनेकठिकाणी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध शिबिरे तसेच महिला स्वबळावर उभ्या राहून नारीशक्ती ही सशक्त होईल यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
याच पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील पवना संस्कृती फार्मर प्रोड्यूसर कंपनी, इंडिया एक्झिम बँक (भारत सरकार) आणि भा.कृ अनु संस्था (आयसीइआर)च्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.८ मार्च) रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारीशक्ती सशक्त करण्यासाठी परिसरातील महिलांना अत्याधुनिक शेती तसेच फुलशेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
- मावळ तालुक्यातील हवामान हे फुल शेतीसाठी पोषक असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे आपला कल वाढवला असून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. विशेष म्हणजे याच फुलशेतीमध्ये (पॉलिहाउस) जवळपास ७० ते ७५ टक्के काम हे महिला वर्गच करत आहे. त्यामुळे जसा आपण आपल्या घरातील किंवा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या फुल शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांचा ही सन्मान केला पाहिजे, याच उद्देशाने पवन मावळातील शेतकऱ्यांसाठी भविष्यातील संधी, आर्थिक पाठबळ, विविध सरकारी योजना तसेच फुल शेतीविषयी पाठशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकूंद ठाकर यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना दिपाली अगरवाल म्हणाल्या, फुल शेतीमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून मोठा प्रमाणात फुल उत्पादन होते. आणि महाराष्ट्रातून ७० ते ७५ टक्के फुले एक्स्पोर्ट होत असतात. एक्स्पोर्टमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, त्या आम्ही इंडिया एक्झिम बँकद्वारे (भारत सरकार) दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. संपूर्ण जगात आपल्या भारतातील आपल्या मावळातील फुलाचा सुगंध पोहचिविण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्यात येईल. तसेच या फूल शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्गाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे मला या ज्या महिला भगिनी फुलाला अगदी आपल्या मुलाप्रमाणे जपतात त्यांचा मला अभिमान वाटतो.
यावेळी इंडिया एक्झिम बँकच्या उपव्यवस्थापकीय संचालिका दिपाली अग्रवाल, जनरल मॅनेजर धर्मेंद्र सचन, मुख्य व्यवस्थापक कौशल गिरी, भा.कृ.अनु.प.पुष्प विज्ञान अनुसंधान निर्देशालयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रभा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम, एनएचबी कन्सल्टंट हेमंत कापसे, माजी सभापती निकिता घोटकूले, पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, यांच्यासह आदी मान्यवर, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयसिंग हुलावळे यांनी केले. तर आभार दिलीप काळे यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News