Dainik Maval News : प्रतिनिधी – संध्या नांगरे : शालेय शिक्षणानंतर पुढच्या वाटचालीची दिशा निवडण्याच्या महत्त्वाच्या वळणावर त्याला मित्ररुपी गुरुचं नेमकं मार्गदर्शन नि प्रोत्साहन मिळालं. त्यानुसार त्यानं मार्गक्रमण केलं आणि दिग्गज गुरुंच्या छायेत आज एक उत्तम कथक नर्तक म्हणून तो नावारुपाला आला आहे. गुरु त्रयींनी पैलू पाडून घडवलेला हा शिष्य म्हणजे युवा कथक नर्तक अनिकेत ओव्हाळ (वय ३०). अनिकेतचं हे उदाहरण गुरुशिष्य परंपरेची महती सांगून जातं.
- अनिकेत पुनावळेमधील रहिवासी आहे. त्याचं शालेय शिक्षण पुनावळेमध्येच झालं. सध्या तो खासगी कंपनीत नोकरी सांभाळून नृत्यकला जोपासत आहे. दहावीनंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी पालकांचा आग्रह असला तरी त्याला शिक्षणात रस नसल्यानं त्यानं नोकरी करायला सुरवात केली. परंतु, दूरदर्शनवर पंडित बिरजू महाराजांचे नृत्याचे कार्यक्रम पाहून आपणही हे नृत्य शिकावं असं अनिकेतला वाटू लागलं.
नृत्याची कोणतीही पार्श्वभूमी त्याला नव्हती. शोध घेताना निगडीमधील नृत्यसंस्थेची माहिती मिळाली आणि ख्यातनाम कथक नर्तक गुरु डॉ. नंदकीशोर कपोते यांच्याकडे वयाच्या १५-१६ व्या वर्षी त्याची शास्त्रीय नृत्य प्रशिक्षणाची सुरवात झाली. ते त्याचे पहिले नृत्यगुरु. येथेच अनिकेतची कथक नर्तक मिलिंद रणपिसे याच्याशी भेट झाली आणि मिलींद हा अनिकेतसाठी केवळ मित्र नाही तर मित्ररुपी गुरु ठरला.
मिलींदनं अनिकेतला शास्त्रीय नृत्यात करिअर करण्यासाठी नेमकी दिशा दिली आणि सन २०१५ मध्ये कलाछाया संस्थेत ज्येष्ठ कथक नृत्यांगना प्रभा मराठे यांच्या शिष्या गुरु रश्मी जंगम यांच्याकडे अनिकेतनं कथकच्या लखनौ घरण्याचं शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली. कलाछाया संस्थेत गेली दहा वर्षे गुरु रश्मीताईंच्या मार्गदर्शनाखाली तो अतिशय निष्ठेनं नृत्याचं अध्ययन करत असून त्याचं संगीत विशारदपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आहे. सोबत नृत्यप्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे.
दिल्लीमध्ये होणारा वसंतोत्सव, कल्पतरु फेस्टीवल, श्याम-ए-कथक, नृत्यप्रवाह, शिवामृत, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज संगित नृत्य महोत्सव, साधना नृत्यसभा, नुपूरनाद अशा विविध संगीत महोत्सवात अनिकेतनं आपलं सादरीकरण केलं आहे. त्याची दोनशेहून अधिक सादरीकरणं आजवर झाली आहेत. आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत पंडित बिरजू महाराज यांच्यासमोर नृत्य सादर करण्याची अनमोल संधी अनिकेतला मिळाली आहे. त्याचे प्रभावी व मनोवेधक सादरीकरण पाहताना अनिकेत ध्येयनिष्ठ कलासाधक असल्याची प्रचिती येते.
- सध्या नोकरी सांभाळून तो नृत्यात करिअर करतोय, ही कौतुकाची गोष्ट आहे. भविष्यात स्वतःची नृत्यसंस्था सुरु करण्याचा अनिकेतचा निश्चय आहे. विविध टप्प्यांवर गुरुंनी पैलू पाडून घडवलेला लख्ख हिरा.. याचं अनिकेत हे मूर्तीमंत उदाहरण आहे. अशाच असंख्य शिष्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या सर्व गुरुंना गुरूपौर्णिमेनिमित्त दैनिक मावळकडून वंदन.
अनिकेत म्हणतो,”मी कलाक्षेत्रात आलो नसतो तर एक सामान्य व्यक्ती असलो असतो. कलाक्षेत्रात आल्यामुळे मी घडलो. गुरु डॉ. कपोते सर, माझा मित्र मिलींद, गुरु रश्मीताई यांनी मला घडवलं आहे. रश्मीताई माझ्या दुसरी आईच आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवना धरणावर धोकादायक पद्धतीने डागडुजी ; धरण 75 टक्के भरलेले असताना सांडव्यावर क्रेन चढवून दुरुस्तीचे काम । Pavana Dam
– लम्पी चर्मरोग प्रादूर्भावामुळे मावळ तालुक्यातील पशूधन धोक्यात ; तातडीने लसीकरण मोहीम हाती घेण्याबाबत प्रशासनाला निवेदन । Maval News
– लोणावळा बस स्थानकाचे रूपडे पालटणार ! टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकर काम सुरू होणार ; परिवहन मंत्र्यांचे आश्वासन । Lonavala News