Dainik Maval News : मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. यातही पवन मावळ विभागात गेल्या 24 तासापासून अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे धरण जलाशयात पाण्याचा येवा वाढून धरणातील पाणीपातळी वाढली आहे. पावसाचा अंदाज आणि पाण्याचा येवा लक्षात घेता, शुक्रवारी (दि. 25 जुलै) रोजी सकाळी अकरा वाजता धरणाच्या सांडव्यावरून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धऱण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरण ८३.१६ टक्के भरले असून सकाळी ११ वाजता सांडव्याद्वारे नदीपात्रात नियंत्रित पद्धतीने १ हजार ४०० क्युसेक विसर्ग करण्यात करण्यात येणार आहे. धरण क्षेत्रातील पाऊसाचे प्रमाण व येव्यानुसार विसर्ग कमी अधिक करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी बाळगावी, अशी माहिती पवना धरण पुरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ ते ४ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नागरिकांसाठी महत्वाची सूचना –
पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये 83.16% भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सकाळी 11:00 वाजता सांडव्यावरून नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने 1400 क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तरी, पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावित. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे. – असे पवना धरण पूरनियंत्रण कक्ष, खडकवासला पाटबंधारे विभाग यांनी सांगितले..
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासाठी वडगावकर नागरिकांना देशी झाडांच्या ७००० रोपांचे मोफत वाटप । Vadgaon Maval
– राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ; ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद
– आंदर मावळ विभागासाठी महिला व बालस्नेही फिरत्या बसचे लोकार्पण ; ३३ गावांना होणार फायदा