Dainik Maval News : लोणावळा व खंडाळा या शहरांमधून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व या मार्गावर सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मनशक्ती ते खंडाळा दरम्यान अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढत प्रसिद्ध केले आहेत. सदर आदेशाची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी लोणावळा शहर पोलीस व खंडाळा महामार्ग पोलीस यांना दिल्या आहेत. असे असताना देखील लोणावळा शहरांमधून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे.
पोलिसांच्या डोळ्यादेखत ही अवजड वाहने राष्ट्रीय महामार्गावरून जात आहेत. काही वाहन चालकांना तर महामार्ग पोलीसच आर्थिक तडजोडीअंती कानमंत्र देत अंतर्गत रस्त्यांवरून जाण्यास परवानगी देत असल्याचे देखील खाजगी मध्ये बोलले जात आहे.
लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी तसेच या मार्गावर लोणावळा गवळीवाडा नाका परिसर व खंडाळा बाजारपेठ या भागामध्ये होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोणावळ्यातील नागरिकांनी उस्फूर्तपणे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखत याठिकाणी मोठे जन आंदोलन केले होते. त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच पुणे जिल्हाधिकारी यांनी या रस्त्यावर अवजड वाहनांना वलवण ते खंडाळा दरम्यान बंदी घातली होती.
- जिल्हाधिकारी पुणे यांनी याबाबतचे परिपत्रक जारी करून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही लोणावळा व खंडाळा महामार्ग पोलीस यांना दिली आहे. तसेच आदेश न पाळल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता. तरी देखील अवजड वाहने गावातून जात असतील तर पाणी नेमकं मुरतंय कोठे याचा देखील विचार करावा लागणार आहे.
वास्तविक पाहता मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी व अडथळे सोडवण्यासाठी महामार्ग पोलीस ही शाखा आहे. मात्र खंडाळा महामार्ग पोलीस वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कधीच दिसत नाहीत, तर ते खंडाळा पोलीस चौकी समोर तसेच खंडाळा बाह्य वळण मार्ग व वलवण येथील टोल नाक्याच्या समोर वाहने अडवून त्यांची तपासणी करण्यात मश्गूल आहेत.
तपासणी केलेल्या किती वाहनांवर कारवाई केली जाते व किती ठिकाणी आर्थिक तडजोड केली जाते, हे त्यांना व देवालाच माहिती. खंडाळा महामार्ग पोलिसांच्या या लुटमारी विरोधात लोणावळ्यातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. द्रुतगती महामार्गाच्या वलवण पुलावर ज्या ठिकाणी खंडाळा महामार्गाचे पोलीस उभे राहतात त्याच ठिकाणी अनाधिकृतपणे बंदी असताना देखील वाहने रस्त्यावर थांबवली जातात. त्या ठिकाणी काही विक्रेते खाद्यपदार्थांची व चहाची विक्री करत आहेत. वास्तविक पाहता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर नागरिकांना व दुचाकी तसेच रिक्षा यांना जाण्यास बंदी असताना देखील महामार्ग पोलिसांच्या डोळ्यासमोर कोणाच्या आशीर्वादाने हे व्यवसाय द्रुतगती महामार्गावर सुरू आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
पुणे जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हे पुणे जिल्ह्याचे प्रमुख असताना देखील त्यांच्या आदेशाला व सूचनांना हे त्यांचेच कर्मचारी मूठमाती देत असल्याचे दिसून येत आहे. आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीत म्हटले होते. आता वरिष्ठांचे आदेश न पाळणाऱ्या व सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खरंच वरिष्ठ कारवाई करणार का? की बिन बोबाट हा सावळा गोंधळ पुढेही सुरू राहणार, अशी विचारणा लोणावळ्यातील नागरिक करत आहेत. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
चार महिने उलटून गेले, तरीही लोणावळ्यातील समस्या जैसे थे – डॉ. किरण गायकवाड
लोणावळ्यातील समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी लोणावळा नगरपरिषदेमध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर पुढील तीन महिन्यांमध्ये लोणावळा शहरातील सर्व प्रश्न सुटतील, असा शब्द या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोणाकर नागरिकांना दिला होता. प्रत्यक्षात मात्र चार महिने झाले तरी येथील समस्या जैसे थे आहेत.
जुन्या समस्यांवर नागरिकांना प्रशासनाकडे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत, मागणी करावी लागत आहे. अशा शब्दात ‘लोणावळा जागरूक नागरिक व मी लोणावळाकर’चे डॉ. किरण गायकवाड यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपण दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतच्या स्मरणपत्र देखील पाठवले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा