मदतीसाठी एक फोन कॉल देखील खूप परिणामकारक ठरतो, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेने केलेली मदत सर्वांनाच झोपेतून जागे करणारी आहे. ( HELP Social Organization For Helping Accident Victims Raigad )
संपूर्ण घटनाक्रम :
“काल (रविवार, 18 सप्टेंबर) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर स्वारगेट मार्गावरील एसटी महामंडळाची शिवशाही बस उंदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हडपसर जवळ समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकली आणि भीषण अपघात झाला. त्या बसमध्ये रायगड जिल्ह्यातील हे संजय भायदे आणि प्रकाश पाटील हे प्रवास करत होते. प्रकाश पाटील यांनी अपघात घडताच ‘अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी’ अभियानाशी संबंधित असलेल्या खालापूरचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते संजय बोंदार्डे यांच्याशी संपर्क करुन काही मदत होईल का, अशी विचारणा केली असल्याची मला माहिती मिळाली.
घटनेची तीव्रता जाणून मी वेळ न दवडता आपल्या अभियानातील महाराष्ट्र एसटी महामंडळाचे कर्जत डेपो मॅनेजर श्री यादव यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या डी टी ओ श्री घोडे यांच्याशी संपर्क करुन दिला. त्याच दरम्यान आपल्या अभियानातील प्रशांत शिरसाट या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला हा घटनाक्रम सांगून अपघातग्रस्तांना मदत कशी होईल आणि उंद्रे पोलीस ठाण्याला माहिती देणे वगैरे विषय हाताळायला सांगितले.
हेही वाचा – Video : मोठी बातमी! जुण्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, एकजण दगावल्याची भीती
एसटी बसमधील जखमी प्रवाशांची जवळील हॉस्पिटलमध्ये कशी सोय करता, येईल यासाठी पूजा साठेलकर / चांदूरकर हिला घटनास्थळा जवळ असलेल्या सर्वच हॉस्पिटलशी संपर्क करायला सांगितले आणि पेशंट ऍडमिशन प्रोसिजरसाठी फॉलोअप घ्यायची जबाबदारी दिली. पुण्याच्या दरम्यान होणाऱ्या अपघातात तेव्हा नेहमीच मदत करणाऱ्या ससून हॉस्पिटलच्या वर्षाताई कुंभार यांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे ससून हॉस्पिटलची यंत्रणा जखमी प्रवाशावर उपचार करण्यासाठी सज्ज राहिली.
दुर्दैवाने या अपघातात रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातील संजय भायदे यांचा मृत्यू झाला. ते रायगड जिल्हा ग्रंथालय क्षेत्राशी संबंधित कोकण विभागाचे अध्यक्ष होते. प्रकाश पाटील हे देखील ग्रंथालय क्षेत्राशी संबंधित असून ते पोयनाड जवळ राहतात. त्यांच्यावर निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बस आणि कंटेनरच्या दोनही चालकांची प्रकृती गंभीर आहे. इतर सर्व प्रवाशांना पुण्यातील विविध ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती पुण्याचे डीटीओ घोडे यांनी दिली.
हेही वाचा – मोठी बातमी! मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरची वाहनाला धडक
या सर्व घटनाक्रमाची तपशीलवार माहिती देण्याचे कारण म्हणजे. पावसाळी दिवसात, ऐन मध्यरात्री आणि तोही पुण्यापासून दूर हडपसरच्या जवळ अपघात झाल्यानंतर, तिथून आपल्या अभियानाशी संपर्क व्हावा आणि मी मदतीसाठी संपर्क केल्यानंतर सर्वांनी गाढ झोपेची वेळ असून देखील व्यवस्थितपणे अपघातग्रस्तांना समाधानकारक मदत होईल यासाठी तत्परता दाखवली, हे विशेष. सर्वांनी केलेल्या किरकोळ स्वरूपाच्या मदतीने गंभीर घटनेची तीव्रता कमी झाली, हे आपणास कळवावे हा हेतू होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोणतीही घटना घडल्यानंतर मदतकार्य हे होतच असते. मात्र त्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे मदत कशी होईल यासाठी आपल्या संस्थेची घेतलेली मदत खऱ्या अर्थाने रिझल्ट ओरिएंटेड असते, हे रात्रीच्या घटनेवरून लक्षात आले. प्रत्यक्ष घटनास्थळी न जाता फक्त फोन कॉल वर देखील खूप दिलासादायक काम होऊ शकते हे लक्षात घेऊन ‘रात्री अपरात्री फोन आल्यास तो मदतीसाठीच असेल हे समजून अटेंड करावा’ आणि आपल्या अभियानाचा हेतू जपावा.
– गुरुनाथ रामचंद्र साठेलकर ( हेल्प, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, रायगड)