Dainik Maval News : मावळ तालुक्यातील देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा 71 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात अन् आनंदात विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भीमअनुयायी येथील भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्तुपास अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. हजारो भीम अनुयायी ऐतिहासिक धम्मभूमीवर दाखल झाल्याने धम्मभूमीला जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते. पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत रांगेत उभे राहून भीम अनुयायांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्तुपापुढे नतमस्तक होऊन अभिवादन केले.
स्वतः डॉ. बाबासाहेबांनी दिनांक २५ डिसेंबर १९५४ रोजी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना देहूरोड येथे केली होती. ही मूर्ती बाबासाहेबांना रंगून येथील जागतिक परिषदेत भेट म्हणून प्राप्त झाली होती. या ऐतिहासिक घटनेच्या वर्धापनदिनानिमित्त देहूरोडमधील बौद्ध विहार व धम्मभूमीवर दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धम्मजागृती अभियान, बुद्धवंदना, पंचशील ध्वजारोहण, धम्मप्रवचन, धम्मदिशा कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार वितरण करण्यात आले. विशेषतः अस्थिस्तूपाच्या दर्शनासाठी भाविकांनी शांततेत रांगा लावत दर्शन घेतले.
वर्धापनदिनानिमित्त समता सैनिक दलाच्या सुमारे १०० सैनिकांनी शिस्तबद्ध मानवंदना दिली. धम्मभूमी परिसरात खेळणी, पुस्तके, बुद्धमूर्ती, फोटो, कॅलेंडर, अल्पोपहार व विविध साहित्यांची दुकाने उभारण्यात आली असून परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय व राज्य राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस आयुक्त, सहायक आयुक्त, निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी मिळून शेकडो पोलिस कर्मचारी सेवेत होते.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने भाविकांसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर, परिचारिका व आरोग्य दूतांची व्यवस्था करण्यात आली होती. आपत्कालीन सेवेसाठी पाण्याचे टँकर, फिरती शौचालये तसेच अग्निशमन बंब तैनात ठेवण्यात आला होता. सकाळी ८.३० वाजता विदर्भातील भीमसैनिकांची महाधम्म रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंचशील ध्वजारोहण व बुद्धवंदना पार पडली. या प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात ११० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या वर्धापनदिनाच्या आयोजनात विविध बौद्ध संघटना, सामाजिक संस्था, प्रतिष्ठाने तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश

