Dainik Maval News : मावळ तालुक्यामध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वनविभागाने तत्परतेने केलेल्या कारवाईमध्ये शिकारीसाठी लागणारी शस्त्रास्त्रे व शिकार केलेल्या वन्यजीवांचे मांस जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
- वनविभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे, विश्वसनीय माहितीच्या आधारे मंगळवारी (दि. १३ मे) तालुक्यातील तिकोणा गाव येथे “सिंग बंगल्यावर” वनविभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईत सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय २६, रा. तिकोणा गाव) या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे ५२ किलो संशयित वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत व वापरलेले काडतुसे आणि शिकारी व सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ९ व ५१ अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई तुषार चव्हाण (उपवनसंरक्षक, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली व मंगेश टाटे (सहायक वनसंरक्षक) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात प्रकाश शिंदे (वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव), सीमा पलोडकर (वनपाल, देवळे), गणेश मेहत्रे (वनपाल, खंडाळा), संदीप अरुण (वनरक्षक, चावसर) आणि शेलके (वनरक्षक, देवळे) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेने व अचूकतेने पार पडली. जप्त करण्यात आलेल्या मांसाचा नमुना वन्यजीव संशोधन केंद्र, गोरेवाडा, नागपूर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी व प्राण्याच्या प्रजातीच्या ओळखीकरिता पाठविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांबाबत मालकी व परवाना याची चौकशी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.
वनविभागाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी. वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro