Pune Ring Road Project Update : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा कायमचा निकाली काढण्यासाठी ‘पुणे रिंग रोड’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून हा रिंग रोड बांधण्यात येणार असून प्रकल्पासंदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जुलै अखेरीस पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या 136 किमी लांबीच्या कामासाठी कंत्राटदार अंतिम करणार असून कंत्राटदार अंतिम झाल्यानंतर प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल, असे सांगितले जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मागील अनेक दिवसांपासून पुणे रिंग रोड प्रकल्पाचे भूमिपूजन कधी होणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू होईल, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समोर आली आहे, त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरवासियांकडून व जिल्ह्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ( Important News Regarding Pune Ring Road Project Update From MSRDC )
- पुणे रिंगरोड प्रकल्पाचे दोन भाग करण्यात आलेत. पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात हे काम पूर्ण होणार आहे. म्हणजे प्रकल्पात ईस्टर्न आणि वेस्टर्न कॉरिडॉरचा समावेश आहे. प्रकल्पासाठी मार्चमध्ये विविध कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या होत्या. दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बोलींचे मूल्यांकन केले जात असून हा प्रकल्प नऊ पॅकेजमध्ये पुर्ण केला जाणार असल्याचे समजते. तसेच या भागांसाठी पाच कंपन्यांची निवड केली जाणार असून प्रकल्पासाठी 17 जानेवारी रोजी निविदा मागविण्यात आल्या होत्या, तर 1 मार्च ही निविदा सादर करण्याची अंतिम मुदत होती.
पश्चिम रिंग रोडचे काम एकूण पाच पॅकेज मध्ये आणि पूर्व रिंग रोडचे काम एकूण चार पॅकेज मध्ये होणार आहे. प्रकल्पाचे काम यंदाच्या पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि डिसेंबर 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे बोलले जात आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत बोलायचे झाले तर पश्चिम रिंग रोडमधील जवळपास सर्व गावांमध्ये जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले असून मोजक्याच काही गावातील जमिनीचे संपादन बाकी आहे.
पूर्व भागातील रिंग रोडसाठी देखील जमीन संपादनाच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम लवकर पूर्ण होईल, अशी आशा आहे. प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी जवळपास 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, ज्यामध्ये 87 गावांमधील 1,900 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे. एकंदरीत पुणे रिंग रोडचे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले असल्याने नजीकच्या काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सुटेल असे दिसते.
अधिक वाचा –
– शिवसेवा प्रतिष्ठान लोणावळा यांच्या मार्फत येळसे गावात वृक्षारोपण आणि वृक्ष दत्तक अभियान
– मोहितेवाडी येथे ‘मनसे’कडून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Maval News
– बांधणी संघटनेची, तयारी विधानसभेची ! मावळ तालुका काँग्रेसकडून नव्या नियुक्त्या जाहीर, महिला तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती