Dainik Maval News : विसापूर गडाच्या पायथ्याशी, मालेवाडीशेजारी झाडाझुडपात विखूरलेल्या बजरंगबलीच्या प्राचीन मंदिराला “सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” कडून पुनर्जीवन मिळून अखेर नूतन मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.
शुक्रवार ता. 7 रोजी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. शनिवारी ता. 8 रोजी मशाल महोत्सव, शिवपूजा जलाभिषेक, सामुदायिक हरिजागर, रविवारी ता. 9 रोजी सत्यनारायण महापूजा होऊन पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर येथील स्थानिक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि बजरंग बलीच्या मूर्तीची नेहमी पूजा करणारे बबन बैकर यांच्या हस्ते मंदिराचे उदघाट्न करण्यात आले. त्यानंतर हरिजागार होऊन इतिहास संशोधक प्रमोद बोऱ्हाडे यांनी विसापूर म्हणजेच संबळगडाच्या इतिहासाची तंतोतंत माहिती अतिशय उत्तमप्रकारे दिली. उपस्थित असंख्य नागरिक विसापूर गडाचा इतिहास ऐकण्यात हरवून गेले होते. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. शेवटी भोजनाची व्यवस्था असल्याने कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलेल्या नागरिकांना एकप्रकारे वनभोजनाचा आनंद घेता आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके उपस्थित होते. त्याबरोबरच सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन शेडगे, इतिहास अभ्यासक प्रमोद बोऱ्हाडे, वन्यजीवरक्षक निलेश गराडे, अनिल आंद्रे, रामनिवास गुप्ता, विनायकराव जाधव, अनिल काकडे, अमोल थोरवे, किरण हुलावळे, राम केदारी, अनिल साबळे, सोमनाथ शिंदे, विश्वनाथ पुट्टूल, ललित धुमाळ उपस्थित होते.
- यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले, “विसापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी तसेच मावळातील इतर प्रत्येक किल्ल्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे. मंदिराच्या आवारात सोलर दिवे व मंदिरासमोर दीपमाळ लावून देण्यात येईल. अतिशय खडतर परिस्थितीत व दोन वर्षांच्या अविरत मेहनतीने संबळगडाच्या पायथ्याला बजरंग बलीचे मंदीर साकाराल्याने त्यांनी ‘सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान’ च्या मावळ्यांचे कौतुक केले. पुढे दुर्गसंवर्धनाच्या कार्यात मी निधी उपलब्ध करुन देणार आहोत आणि सर्वोत्तम काम करुन घ्यायची जबाबदारी तुमची असेल असेल” असे त्यांनी मत व्यक्त केले.
नूतन मंदिराला फुलांचा साज
पूर्वी एक बजरंगबलीची मूर्ती व आजूबाजूला प्राचीन मंदिराचा झाडाझुडपातील भग्नावस्थेतील चौथरा अशी स्थिती त्याठिकाणी होती. “सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” ने दोन वर्षे केलेल्या मेहनतीमुळे अखेर मंदिराचे रूप पालटले आहे. दगडांचे बांधकाम त्यात मंदिराला विशिष्ट प्रकारचा रंग देण्यात आला आहे. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी मंदिर सजविण्यात आले होते. मंदिरासमोर बजरंगबलीची सुंदर प्रकारची रांगोळी भाविकांचे तसेच उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामुळे विसापूर गडाच्या भोवतीच्या गर्द झाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका