Dainik Maval News : जागतिक वारसा समितीची ४७ वी परिषद फ्रान्समधील पॅरिस येथे आज (दि. ११ ) पार पडली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठा साम्राज्यातील बारा शिवकालीन गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी भारत सरकारतर्फे युनेस्कोला पाठविण्यात आलेला प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला. त्यात मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा देखील समावेश झाला आहे. त्यामुळे तमाम शिवभक्तांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
- मावळ तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे लोहगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे लोहगडला खऱ्या अर्थाने गतवैभव प्राप्त होईल. लोहगड किल्ला व परिसराचा प्रचंड कायापालट होईल. जगभरातून पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी येतील. नवीन नवीन प्रकल्प या ठिकाणी येतील. पायाभूत सुख सुविधांचा विकास होईल. मावळचे प्रमुख पर्यटन केंद्र लोहगड होईल. त्यामुळे स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल व पर्यायाने या परिसराचा विकास होईल.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचातर्फे लोहगडावर गेली २५ वर्षे दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील जीर्ण झालेल्या शिवमंदीराचा सर्वप्रथम जीर्णोद्धार करण्यात आला. महाशिवरात्री यात्रा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. भारतीय पुरातत्व विभागाकडे मंचातर्फे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे गडाला नवीन गणेश दरवाजा बसविण्यात आला. गडाचे दरवाजे आता सायंकाळी ५ वाजता बंद केले जातात. त्यामुळे गडावर घडणारे गैरप्रकार बंद झाले. मंचाने भारतीय पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी गडाच्या इतर सुधारणांसाठी पाठपुरावा केला व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला. गडाला पायऱ्या, बुरुज, तटबंदी आदींच्या दुरुस्तीची कामे चालू झाली. मंच व ग्रामस्थांच्या वतीने लोहगड पायथ्याला शिवभक्तांसाठी प्रेरणादायी भव्य शिवस्मारक उभारणी देखील करण्यात आलेली आहे. भारतीय पुरातत्व अधिकारी गजानन मुंढावरे यांनी याकरिता विशेष प्रयत्न केले.
लोहगड विसापूर विकास मंच गेली २५ वर्षे अविरतपणे लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. “संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड किल्ल्यांचे” या ब्रीद वाक्यानुसार मंचाचे कार्य सुरू आहे. लोहगड पायथ्याला असणाऱ्या शिवस्मारकाचा विकास करून या ठिकाणी भव्य शिवसृष्टी उभी करण्याचा मंचाचा मानस आहे. त्यामुळे येथे जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना शिवरायांचा पराक्रमी इतिहास अनुभवता येईल. यासाठी शासनाच्या वतीने भरघोस मदत मिळावी. – सचिन टेकवडे (संस्थापक, लोहगड विसापूर विकास मंच)
छत्रपती शिवरायांचे बारा दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केल्याबद्दल केंद्र राज्य सरकार व सर्व शिवप्रेमी चे अभिनंदन. हे यश खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या दुर्गांच्या संवर्धनासाठी, अतिक्रमण मुक्तीसाठी झटणाऱ्या तमाम शिवभक्त कार्यकर्त्यांचे आहे. – संदेश भेगडे, बजरंग दल
- जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी भारत सरकारतर्फे २०२४-२५ साठी सादर होणाऱ्या प्रस्तावात महाराष्ट्रातले नऊ गिरीदुर्ग व तीन जलदुर्ग अशा बारा गडकोटांना नामांकन देण्यात आले होते. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांनी केलेला पराक्रम, लष्करीदृष्ट्या केलेली गडकोटांची बांधणी याची दखल आता जागतिक स्तरावर घेतली जावी यासाठी केंद्राने एक पाऊल पुढे टाकले आहे. वारसा स्थळाच्या यादीत शिवछत्रपतींचे जन्मस्थळ शिवनेरीसह, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, द्वितीय राजधानी रायगड सह साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग त्याचबरोबर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश केला आहे.
लोहगडचा इतिहास –
पुरंदरच्या तहामध्ये मुघलांकडे हा किल्ला गेला होता. सुरतची संपत्ती या ठिकाणी ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड. या गडावर नेताजी पालकर, कान्होजी आंग्रे यांचे काही काळ वास्तव्य होते. तसेच पेशवे काळात नाना फडणवीस यांचे पण या किल्ल्यावर वास्तव्य होते. त्यांच्या काळात त्यांनी या गडाची काही डागडुजी केली होती. गडावर सोळा कोन असलेला तलाव आहे, शिवमंदिर आहे, गडाला पाच दरवाजे आहेत. विंचू कडामाची, जिथे सुरतची संपत्ती ठेवली होती अशी लक्ष्मी कोठी, भक्कम बुरुंज, तटबंदी, सुंदर अशा पायऱ्या तसेच गड परिसरामध्ये समोर असलेले तुंग, तिकोना व विसापूर हे किल्ले. जवळची पवना नदी व पवना धरण हे देखील गडाच्या वैभवात भर घालते.
युनोस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडचा समावेश झाल्याबद्दल शिवभक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.