Dainik Maval News : पवन मावळ विभागातील प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत शिळींब मधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये शिळींब ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यानंतर नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली. परंतु या नवीन ग्रामपंचायतीला कामकाज करण्यात अडथळा येत आहे. यातील प्रमुख बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी बदली झालेल्या ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीचे दप्तर नवीन ग्रामसेवकाकडे सोपविले नसल्याचे सध्याचे ग्रामसेवक सांगतात. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा मुद्दा चर्चेला आल्यानंतर ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार संपूर्ण ग्रामसभेने माजी ग्रामसेवकाविरोधात चौकशीचा ठराव मंजूर केला आहे. तसेच माजी ग्रामसेवकाची चौकशी सुरू असल्याचे गट विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपूर्ण प्रकरण काय?
ग्रुप ग्रामपंचायत शिळींब मध्ये सध्या लोकनियुक्त सरपंच सिद्धांत उर्फ सनी कडू हे त्यांच्या निर्वाचित सदस्यांसोबत कारभार पाहत आहे. विविध लोकाभिमुख कार्यक्रम हाती घेवून ग्रामपंचायतीचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात जुणे रखडलेले विकासकामे मार्गी लावणे, नवीन महत्वाची विकासकामे हाती घेणे आदी गोष्टी सरपंच आणि सदस्य करू इच्छित आहेत. परंतु, या सर्वांत मागील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांची बॉडी आणि तत्कालीन ग्रामसेवक यांनी केलेल्या चुकांचे घोडे आडवे येत आहे. त्यात माजी ग्रामसेवक संतोष बोद्रे यांनी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करत असताना मनमानी पद्धतीने कामकाज केल्याचे आणि नियमबाह्य सरकारी दप्तर हाताळल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाही तर नुकतीच त्यांची चावसर येथे बदली झाली. तिथे जाताना त्यांनी शिळींब ग्रामपंचायतीचे दप्तर आपल्याकडे सोपविले नसल्याचे नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक दीपक शिरसाट यांनी सांगितले आहे.
ग्रामसभेत चर्चा आणि ठराव
नुकतीच शिळींब ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न झाली. मंगळवारी (दि.२४) भैरवनाथ मंदिर येथे झालेल्या ग्रामसभेला ग्रामसभा सभासद मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी गावातील प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांवर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर घरपट्टी, पाणीपट्टी यांचा विषय चर्चेला आला. सध्या ग्रामपंचायतीत कुठलीही शिल्लक नसल्याने ग्रामस्थांनी घरपट्टी भरावी असे सरपंच आणि ग्रामसेवकांनी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढा वाचायला सुरूवात केली. यात अनेक ग्रामस्थांनी आपण पैसे भरले परंतु घरपट्टीची पावती मिळाली नाही, घरपट्टी जास्तीची येत आहे, अशी तक्रारी केल्या. या तक्रारीच्या केंद्रस्थानी माजी ग्रामसेवक बोद्रे होते. यात अनेक ग्रामस्थांनी जन्म मृत्यूच्या चुकीच्या नोंदी केल्याचे, किंवा न केल्याचे सांगितले. तसेच विवाह नोंदणी न करणे, परस्पर पैसे घेवून पावत्या न देणे असे प्रकार माजी ग्रामसेवक बोद्रे यांनी केल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. त्यामुळे सर्वानुमते माजी ग्रामसेवकाविरुद्ध चौकशी करण्याचा आणि त्यास निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
‘माजी ग्रामसेवकाने आणि तत्कालीन सदस्य बॉडीने केलेल्या गलथान कारभारामुळे आता काम करण्यात अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीचे दप्तर गायब आहे, रजिस्टर जागेवर नाही, अनेक नोंदी गायब आहेत, घरपट्टीमध्ये चुका आहेत, कित्येक प्रस्ताव पुढे पाठविलेले नाहीत, यामुळे ग्रामपंचायतीत सध्या कामकाज अस्थिर झाले आहे. तसेच नवीन ग्रामसेवकाला देखील काम करता येत नाही. त्यामुळे जुन्या ग्रामसेवकाने व्यवस्थित चार्ज द्यावा, दप्तर हाती द्यावे आणि वरिष्ठांनी ग्रामसेवक संतोष बोद्रे विरुद्ध कडक कारवाई करावी.’ – सिद्धांत उर्फ सनी कडू, सरपंच, शिळींब
‘माझ्याकडे माजी ग्रामसेवकाने कोणतीही कागदपत्रे तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर सोपविले नसल्याने कामकाज करताना अडचण येत असून कामाचा खोळंबा होत आहे.’ – दीपक शिरसाट, नवनियुक्त ग्रामसेवक, शिळींब
‘शिळींब ग्रामस्थांची तक्रार आपल्याला मिळाली असून नवीन रुजू झालेले विस्तार अधिकारी यांच्या मार्फत शिळींब ग्रामपंचायतीचे माजी ग्रामसेवक संतोष बोद्रे यांची चौकशी सुरू असून त्या चौकशीअंती कारवाईचे निर्णय घेतले जातील.’ – सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मावळ
दरम्यान, याबाबत संतोष बोद्रे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वारंवार त्यांच्यासी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची बाजू समजली नाही.
दरम्यान सरपंच सिद्धांत उर्फ सनी कडू यांनी ग्रामपंचायत शिळींब बाबत मांडलेले काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे ;
१) ग्रामपंचायत दप्तर ज्यामध्ये ८,९, १० नंबर अशा प्रकारचे कोणतेही रजिस्टर ग्रामपंचायत मध्ये दिसत नाही. ग्रामसेवकांनी परस्पर ते सर्व रजिस्टर स्वतःच्या मालकीच्या असल्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या घरी घेऊन गेले आहे.
२) ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामपंचायतचे दप्तर कोणत्या अधिकाराने ग्रामसेवक संतोष बोडरे ह्यांनी घरी नेले याची सखोल चौकशी करावी, अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे.
३) ग्रामपंचायतच्या जन्म -मृत्यूच्या नोंदी ग्रामपंचायतच्या दप्तरी दिसत नाही, परंतु पाच वर्षाच्या काळात जन्म-मृत्यूचे दाखले दिले गेलेत आहे.
४) नागरिकांनी कर पावत्या भरल्या असून त्यांना कोणतीही पावती दिल्या गेल्या नाही ज्या पावत्या दिल्या गेल्यात त्या ग्रामपंचायतच्या दप्तरी दिसत नाही.
५) अडीच महिन्यांपूर्वी ग्रामसेवक संतोष बोडरे यांनी चार्ज सोडला असून त्यानंतर नवनियुक्त ग्रामसेवक दीपक शिरसाट हे रुजू झाले पण मागील ग्रामसेवक संतोष बोडरे यांनी दीपक शिरसाठ यांना कोणतेही दप्तर दिले नाही, त्यामुळे ग्रामपंचायतील सर्व नागरिकांचे अतोनात हाल होतात विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्म दाखले शालेय कामकाजासाठी मिळत नाही.
६) सरपंच सिद्धांत कडू यांनी वारंवार उच्च अधिकारी व ग्रामसेवक बोडरे यांना संपर्क करायचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून वारंवार उडवा – उडवी चे उत्तरे मिळाले. त्यामध्ये ग्रामपंचायत मधील नागरिकांना जो त्रास होतोय त्याला सर्वस्व जबाबदार अधिकारी व ग्रामसेवक संतोष बोडरे हेच आहेत.
७) ग्रामसेवक बोडरे यांनी जन्म-मृत्यूचे दाखले, ८अ, इतर कोणत्याही कामा संदर्भात नागरिकाकून वारंवार पैशाची मागणी करत असत आणि लोकांना नाहक त्रास देऊन ते पैसे घेत असत.
८) ग्रुप ग्रामपंचायत मध्ये बंगले, हॉटेल्स त्यामध्ये हिल्टन हॉटेल आणि व्यावसायिक नागरिक यांच्याकडून मागील पाच वर्षात टॅक्स वसूल करण्यात आलेला असून कंपनीला तसेच ग्रामसेवकाला त्याच्या आलेल्या पेमेंट बद्दल माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
९) तसेच मोठ्या प्रमाणात टॅक्स येणाऱ्या हिल्टन कंपनीला संदर्भात पत्रव्यवहार केला पण त्यांनी माहिती देण्यात नकार दिलाय. त्यामध्ये असं दिसून येते की पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला असून ते लपवण्याचे हिल्टन कंपनी, उच्च अधिकारी व ग्रामसेवक लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
१०) मागील पाच वर्षात जो काही भ्रष्टाचार झाला आहे, त्याची सखोल चौकशी करावी नाहीतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करीन असा इशारा सरपंच सिद्धांत कडू यांनी प्रशासनाकडे केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद ; ग्रामपंचायतींना 15 लाखांपर्यंतची विकासकामे करण्याचा अधिकार
– पीएमआरडीएच्या 3 हजार 838 कोटी 61 लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी । PMRDA
– चांदखेड ग्रामपंचायतीची 80 हजारांची केबल चोरीला, गुन्हा दाखल । Maval Crime