वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने दाखले मिळावेत अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार शेळके यांनी पत्रात म्हटले आहे की, “सद्यस्थितीत सर्वत्र शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु असून त्यासाठी उत्पन्नाचा दाखला,नॉन क्रिमीलेअर दाखला, जातीचा दाखला आणि रहिवासी दाखला हे शासकीय दाखले महसूल विभागाकडून मिळणे आवश्यक असतात. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी सदर दाखले मिळणेकामी प्रक्रिया करीत असून संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता करुनही नागरी सुविधा केंद्र, वडगाव ता. मावळ येथील सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे दाखले मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.”
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास होत असुन पावसाळ्याच्या दिवसात वडगाव येथील नागरी सुविधा केंद्रात ये–जा करणे अत्यंत गैरसोयीचे ठरत आहे. शासनाकडून सदर दाखले विनाविलंब मिळावे यासाठी फिफो प्रणाली सुरु करण्यात आलेली आहे. परंतु तरीही सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होत असुन विद्यार्थी व पालकांच्या असंख्य तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत.”
“तरी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शासकीय दाखले त्वरित मिळणेकामी ठोस पर्याय म्हणून सदर दाखले ‘ऑफ लाईन’ पद्धतीने मिळणेकामी तात्काळ उचित कार्यवाही व्हावी,” अशी विनंती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे आमदार महोदयांनी केली आहे. ( Issue certificates to students offline MLA Sunil Shelke Demand letter to Pune District Collector )
सर्व्हर डाऊन व इतर तांत्रिक अडचणींमुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी विलंब होत आहे. दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल लागल्यामुळे आता पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग वाढली आहे. ठरविलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवायचा असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांची धडपड सुरु आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख निश्चित केलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळवणे गरजेचे असते. त्यामुळे एकावेळी तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे दाखल्यांसाठी मागणी अर्ज येत असल्याने यंत्रणेवरही ताण येतो. त्यातच इंटरनेट सेवेतील त्रुटींमुळे सर्व्हर डाऊनचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होऊ शकतो,याचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने योग्य नियोजन राबविणे गरजेचे आहे.
अधिक वाचा –
– पाऊस आला धावून…पूल गेला वाहून!! वाडीवळे पुलाचे काम सुरु, तात्पुरता बांधलेला बंधारा वाहून गेल्याने 9 गावांचा संपर्क तुटला
– ‘बा विठ्ठला…समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर’, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे; काळे दांपत्य मानाचे वारकरी