Karla Malavli Bridge : कार्ला – मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण झाले नाहीच. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पर्यायी साकव पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परंतू आता प्रशासनाच्या या दिरंगाईने एका सामान्य नागरिकाचा जीव गेला आहे. मळवली येथील पर्यायी साकव पुलावरून एक आदिवासी व्यक्ती इंद्रायणी नदीत वाहून गेला असून काल, शुक्रवारपासून त्याचा शोध सुरू आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शुक्रवारी, दिनांक 5 जुलै सकाळी 6 च्या सुमारास भीमा पवार ही व्यक्ती इंद्रायणी नदीच्या पर्यायी साकव पुलावरून पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची दुर्घटना घडली. याबाबतची माहिती पोलिस पाटील संजय जाधव यांनी दिली. त्यानंतर शिवदुर्गची रेस्कू टीम आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि वाहून गेलेल्या भीमा पवार यांचा शोध सुरू केला. ( Karla Malavli Bridge One person died due to being washed away in Indrayani river )
इंद्रायणी पर्यायी पुलावरुन एक व्यक्ती पुलावरून वाहून गेल्याची माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग पथक, मावळ वन्यजीव रक्षक पथक मावळ, प्रशासकीय यंत्रणा, पोलिस प्रशासन तसेच स्थानिक नागरिक यांनी शोध मोहीम सुरू केली. नदीपात्रात जलपर्णी असल्याने शोध कार्यात काहीसा अडथळा येत आहे. शुक्रवारी संध्याकाळ पर्यंत सदर व्यक्तीचा शोध लागला नाही, त्यामुळे आज (शनिवारी) पुन्हा शोधमोहिम सुरू होणार आहे.
कार्ला – मळवली मार्गावरील इंद्रायणी नदीवर सध्या नवीन पुलाचे काम सुरू आहे. हा पुल पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावा, यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने केली, मोर्चे काढले, प्रशासनाला निवेदने दिली. प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने देऊन वेळ मारून नेली. परंतु पूल काही झाला नाही, आणि ऐन पावसाळ्यात नागरिकांना पर्यायी अर्धा वाहून गेलेल्या साकव पुलावरून प्रवास करावा लागला. आणि यातच आता एका सामान्य निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे.
अधिक वाचा –
– राज्यात शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धेचे आयोजन, जाणून घ्या माहिती
– ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी तब्बल 46 हजार कोटींची तरतूद ; अर्ज प्रक्रियेत महिलांची अडवणूक खपवून घेणार नाही
– महत्वाचे ! झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर, गर्भवतींसाठी विशेष सूचना, वाचा सविस्तर