Dainik Maval News : कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी येणारे अडथळे व कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर कमी खर्चात मिळण्यासाठी, मावळातील नागरिकांना त्यांच्या गावातील कुणबी नोंदी शोधून देण्यासाठी मावळ अखंड मराठा समाजाच्या वतीने मावळचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच यासंदर्भात चर्चाही करण्यात आली.
मावळ तालुक्यात जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये अनेक गावातील कुणबी नोंदी मोडी लिपीत उपलब्ध आहेत. त्या नोंदी मोडीलिपीत असल्याने अनेकांना त्याबद्दल कल्पना नाही. तसेच मोडी लिपी वाचता येत नसल्याने अनेक अडथळे येत आहेत. जुन्या दस्तांमध्ये आढळलेल्या कुणबी नावापर्यंत पोहचण्यासाठी गाव, देवस्थान, शाळा, वन, नगरपालिका, आरोग्य विभाग व जमीन संदर्भात असलेले टिपण, कडईपत्रक, जन्म-मृत्यू रजिस्टर, वारस रजिस्टर, जंगल गुणाकार बुक, खासरा पत्रक, बोट खत, कुळ रजिस्टर, सूद रजिस्टर हे व्यवस्थितपणे उपलब्ध होत नाहीत. तसेच यातील काही कागदपत्रे गहाळ सुद्धा झालेली दिसत आहेत.
काही गावातील हीच कागदपत्रे दुसऱ्या गावातील कागदपत्रात एकत्र झालेली आहेत. ही जुनी कागदपत्रे काढण्यासाठी काही एजंट लोकांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे गोर-गरीब शेतकऱ्यांना हे प्रमाणपत्र काढण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे म्हणून मावळ मराठा समाजाच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या आहेत.
मुख्य मागण्या :
1. मोडी लिपितील कुणबी नोंदी लिप्यांतर करून गाववाईज याद्या जाहीर कराव्यात
2. वंशावळ जुळवण्यासाठी लागणारी जुनी सर्व कागदपत्रे व्यवस्थित मिळावी
3. मावळातील शाळा, देवस्थान, जुने खटले, नगरपालिकेलतील, वनविभागातील, आरोग्यविभागातील, शिक्षण विभागातील कुणबी नोंदी शोधाव्यात
4. ब्रिटिशकाळात झालेल्या लसीकरणातील नावे, रेकॉर्ड उपलब्ध व्हावं
5. मावळातील जुने खरेदीखत रजिस्टर उपलब्ध करावं
6. इनाम, वतन व कुळातील नावे उपलब्ध करावी
7. जुनी मोडी लिपितील कागदपत्रे मराठी मध्ये लिप्यांतर करून सही-शिक्क्याने उपलब्ध करावी
8. एकत्रित झालेली जुनी कागदपत्रे ज्या-त्या गावच्या दप्तरात व्यवस्थित ठेवावी
9. अधिक पैसे घेणाऱ्या एजंटचा सुळसुळाट थांबवावा त्यांच्यावर कारवाई करावी
कठोर कारवाई करणार :
येत्या 26 तारखेला वनविभाग, शिक्षण विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांचे अधिकारी व मराठा समाज यांच्यासोबत मिटिंग घेऊन, तालुक्यातील या विभागातील जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच कुणबी नोंदी शोधून देणारे, जुने कागदपत्रे, प्रमाणपत्र काढून देणारे व अधिक पैसे घेणारे जे कोणी एजंट आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News

