रविवारी (दिनांक 23 जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी गावाच्या हद्दीत किलोमीटर 41 जवळ दरड कोसळली. तुफान पाऊस आणि सतत्या पाण्याच्या अंतर्गत प्रवाहाने रात्रीच्या सुमारास एक्सप्रेस वेवरील मुंबई लेनवर डोंगराचा काही भाग कोसळला. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन बंद झाल्या. ( Land Sliding In Borghat on Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर घटनेची माहिती मिळताच आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आदी यंत्रणा तत्काळ जागेवर पोहोचल्या. दरड मोठ्या प्रमाणावर कोसळली होती. त्यामुळे तिला हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. दोन जेसीबी आणि डंबर ह्यांच्या सहाय्याने मलबा उचलण्याचे काम सुरु करण्यात आले. जवळपास 30 ते 40 डंबर मलबा उचलण्यात आला. ह्या सर्व प्रक्रियेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः खोळंबली होती.
त्यानंतर हळूहळू मुंबईकडे जाणारी लेन ओपन करण्यात आली. ह्यात इतका वेळ वाहतूक बंद झाल्याने अनेक अवजड वाहन चालक ह्यांनी गाडीत झोप काढली होती. अशा झोपलेल्यांना उठवून वाहतूक सुरु करण्यात मदत यंत्रणांची धावपळ सुरु होती. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतू ऐन रात्रीच्या सुमारास वेग मंदावल्याने पर्यटक आणि अन्य प्रवासी ह्यांचा मोठा खोळंबा झाला.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात चोरीच्या घटनेतील आरोपी 12 तासात गजाआड; शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
– स्तुत्य उपक्रम! बेबडओहळ गावात भद्राय राजते प्रतिष्ठानकडून औषधी वनस्पतींची लागवड