Dainik Maval News : मावळात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यात ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक असून यादरम्यान घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा पडल्या होत्या. हे प्रकरण ताजे असतानाच पवन मावळ विभागातील आणखीन एक किल्ला तिकोणा गडावर रविवारी भुस्खलन झाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवारी दुपारी बाराच्या सुमारास गडावरील श्रीरामाची गादी येथील काही भागात भूस्खलन होऊन तेथील दगड-गोटे खाली आले. अचानक घडलेल्या या घटनेने तिकोणापेठ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पवन मावळातील किल्ले तिकोणा उर्फ वितंगगड गडाच्या पायथ्याशी तिकोणापेठ गाव वसलेले असून किल्ल्याला लागूनच गावातील वस्ती आहे. या वस्तीची लोकसंख्या 500 पेक्षा अधिक आहे. रविवारी सकाळी 11:45 च्या सुमारास दरड कोसळल्याचा आवाज आल्याने तिकोणापेठ येथील अजित ज्ञानदेव मोहोळ हे घरातुन बाहेर आले. ( Landslide at Trikona Fort in Pawan Maval area fort closed for tourism Tehsildar Vikram Deshmukh )
मोठा आवाज झाल्याने स्थानिक अजित ज्ञानदेव मोहोळ हे घरातून बाहेर आले आणि त्यांनी गडावरून दगड-गोटे पडताना पाहिले. त्यांनी तातडीने याची माहिती गावकऱ्यांना आणि प्रशासनाला दिली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विक्रम देशमुख हेही तातडीने तिथे आले. सुदैवाने गावात कोणतीही हानी झाली नाही. परंतु तहसीलदार विक्रम देशमुख यांनी परिसराची पाहणी करून सुरक्षेस्तव किल्ला काही दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडून पाहणी –
तिकोणा गडावरील भूस्खलनाची माहिती मिळताच तहसीलदार विक्रम देशमुख गडपायथ्याशी आले. त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती घेत पाहणी केली. ‘तिकोना गड पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. स्थानिक गावकऱ्यांनी देखील काळजी घ्यावी. ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनाही अलर्ट राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच लवकरच या ठिकाणचे भू सर्वेक्षण करणार आहे,’ असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– लोणावळेकरांनो काळजी घ्या, पावसाचा जोर वाढलाय, यंदाच्या मोसमात 4000 मिलिमीटर पाऊस पूर्ण, वाचा अधिक । Lonavala Rain Updates
– मावळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इन्कमिंग, ग्रामीण भागातील अनेकांचा पक्षप्रवेश, शरद पवारांची घेतली भेट
– मोठी बातमी ! पावसाचा जोर प्रचंड वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, पवना नदीपात्रात 7070 क्युसेक विसर्ग सुरू । Pavana Dam News