Dainik Maval News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू झाल्यापासून मावळ तालुक्याच्या राजकीय वर्तुळात पडद्यासमोर अन् पडद्यामागे चर्चेपासून चार हात दूर असलेला ‘विरोधी आवाज’ सोमवारी (दि. २७) अचानक समोर आला. अन् नुसता समोर आला नाही तर निवडणुकीचे रणशिंग फुंकून मोकळाही झाला.
महाविकासआघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस (आय) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष सामील झाले असून या पाचही पक्षांनी मावळ तालुक्यात ‘महाविकासआघाडी’ म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जायचे जाहीर केले आहे.
‘मविआ’च्या या एन्ट्रीमुळे मावळ तालुक्याच्या राजकारणात आणखीन रंगत येणार आहे. याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या भोवती फिरत असलेल्या राजकारणाचा परीघ आता आणखीन विस्तारणार आहे. विरोधकांचा एक भक्कम आवाज समोर आल्याने निवडणुका देखील चुरशीच्या होतील.
सर्वाधिक महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडे तिकीटासाठी धाव घेणाऱ्या उमेदवारांना विशेषतः तिकडे तिकिट न मिळालेल्या नाराज उमेदवारांना ‘महाविकासआघाडी’च्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या नव्या पर्यायाचा आता इच्छुक उमेदवारही नक्कीच विचार करतील.
थोडासा मतदारांचा आढावा घेतल्यास मावळ तालुक्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची विचारधार मानणारा एक मोठा वर्ग आहे, हे नाकारता येत नाही. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिल्यास मावळ लोकसभेतून निवडून आलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांना सहाही विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक कडवी झुंज ही मावळ विधानसभेत मिळाली होती, हे सत्य आहे.



