Dainik Maval News : तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रातील नवलाख उंब्रे ते बधलवाडी दरम्यानच्या एमआयडीसी फेज १ ते फेज २ जोडरस्त्याच्या अभावामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी आणि लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
जोडरस्त्याच्या मार्गाच्या कामासंदर्भात प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी सोमवारी (दि. ४ ऑगस्ट २०२५) रोजी सायंकाळी ६ वाजता नवलाख उंब्रे येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरात महत्त्वपूर्ण सभा आयोजित केली आहे. या बैठकीत एमआयडीसी बंद, उपोषण, रास्ता रोको यांसारख्या तीव्र आंदोलनांचा निर्णय घेण्यात येणार असून यापुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.
एकूण ९०० मीटरचा हा रस्ता नसल्याने नवलाख उंब्रे, बधलवाडी, आंबी, मंगरूळ, जाधववाडी, मिंडेवाडी आणि कदमवाडी येथील नागरिक, तसेच MIDC तील कामगार आणि वाहनचालक यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. सकाळी व सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होत असून अनेक वेळा दोन-दोन तास वाहतूक ठप्प होते. गेल्या काही वर्षांत या मार्गावर अपघातात १५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
याठिकाणी ह्युंदाई, एल अँड टी, इमरसन आदी मोठ्या कंपन्यांसह या परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू आहेत. मात्र, फेज १ ते फेज २ जोडणारा रस्ता गेल्या ८ वर्षांपासून केवळ कागदावरच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MIDC प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली गेली, परंतु याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही.
या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ११ ऑगस्टपासून तळेगाव दाभाडे MIDC बंद करण्याचा व MIDC पोलीस ठाण्याजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा या बैठकीत दिला जाणार आहे. जोपर्यंत या रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
हा रस्ता झालाच पाहिजे, आता गप्प बसणार नाही, असा निर्धार या भागातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यामध्ये नवलाखउंब्रे, बधलवाडी, आंबी, मंगरूळ, जाधववाडी, मिंडेवाडी व कदमवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सभा स्थळ : श्री भैरवनाथ मंदिर परिसर, नवलाख उंब्रे
वेळ : सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या