Dainik Maval News : लोणावळा जवळील कुरवंडे येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर व लायन्स पॉईंट या पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने विविध विकासकामे प्रस्तावित आहेत. या संदर्भात विकास आराखडा तयार करण्यात आला असून या परिसरात ग्लास स्कायवॉक तसेच लायन्स व टायगर पॉईंट जोडणाऱ्या दरीवरील पूल, साहसी खेळांचा विकास, प्रकाश व ध्वनी शो, रस्ता रूंदीकरण अशा विविध पायाभूत सुविधांची विकास कामे प्रस्तावित आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्यात ग्लास स्कायवॉकसारखा पहिलाच प्रकल्प होत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचे मोठे केंद्र बनू शकणाऱ्या या पर्यटन ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. त्यासाठी आयआयटी रुरकी आणि दिल्ली येथील स्ट्रक्चरल डायनॅमिक विभागाचे मार्गदर्शन घेण्यात यावे. या प्रकल्पातील पाणीपुरवठा आणि रस्त्यांची कामे शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावीत, तर उर्वरित पायाभूत सुविधा उभारण्याची कामे पीपीपी तत्त्वावर करण्यात यावीत, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.
मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार सुनील शेळके, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, क्रीडा विभागाचे आयुक्त राजेश देशमुख आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महानगर आयुक्त योगेश म्हसे आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील विविध विकासकामांना मान्यता देऊन भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या निधीतून सुरु असलेल्या विकासकामांना गती देऊन ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे प्रस्तावित विकासकामांची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी. मावळ विधासनभा मतदारसंघातील पूर्ण झालेल्या विकासकामांचे उद्घाटन आणि निविदा प्रक्रिया झालेल्या कामांचे भूमीपूजन सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला घेण्याबाबतची तयारी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले. ( Lonavala Tiger Point Lions Point Glass Skywalk Project Ajit Pawar special advice )
अधिक वाचा –
– माळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन, आमदार शेळकेंच्या माध्यमातून 30 लाखांचा निधी
– तळेगाव दाभाडे शहराला आंद्रा धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा ; अजित पवारांनी मागवला अहवला । Maval News
– मोठी बातमी ! आदिवासीबहुल गावांमध्ये आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर, मावळातील गावांचा समावेश