Dainik Maval News : बाजारपेठेत रस्त्याने जाताना हरवलेली अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या आधारे शोधून काढत वडगाव मावळ पोलिसांनी काही तासांत संबंधित महिलेला पुन्हा मिळवून दिली. वडगाव मावळ पोलिसांच्या या कार्यकुशलतेचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
पौड (ता. मुळशी) येथील परमेश्वर पांडुरंग पवार (वय 35 रा. पौड, ता. मुळशी) हे आपल्या पत्नीसह वडगाव मावळ येथे नातेवाईकांकडे आले होते. खरेदीसाठी दोघे वडगाव बाजारात गेले असताना येथील पोटोबा महाराज मंदिर परिसरात त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चैन हरवली.
ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वडगाव मावळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड, सहायक पोलिस फौजदार अजित ननावरे, आशिष काळे, पोलिस शिपाई विठ्ठल पतुरे, किरण ढोले, देविदास भांगे, प्रुफल्ल गोरे, प्रतीक राक्षे, सागर ढमाले या पथकाने तात्काळ घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान मंदिरासमोरील केळी विक्रेत्याच्या गाड्याजवळ रस्त्यावर पडलेली चैन एका महिलेला सापडल्याचे दिसून आले. संबंधित महिलेने चैन उचलल्यानंतर तेथून केळी खरेदी करताना स्कॅनरद्वारे डिजिटल पेमेंट केल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट झाले.
महिलेची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी हुशारीने केळी विक्रेत्याकडील स्कॅनरचे व्यवहार तपासले. त्या वेळेतील व्यवहारांची माहिती मिळवून संबंधित बँक खात्याचा तपशील काढण्यात आला. त्यातून संबंधित महिला राजगुरुनगर (ता. खेड) येथील असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तात्काळ तिच्याशी संपर्क साधला असता तिने प्रामाणिकपणे चैन सापडल्याची कबुली देत ती पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यानंतर पोलिसांनी ही सोन्याची चैन परमेश्वर पवार यांच्या पत्नीला परत दिली.
पोलिसांच्या या जलद आणि तांत्रिक तपासामुळे हरवलेली चैन काही तासांत मिळाल्याने पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. या संपूर्ण कारवाईत पारंपरिक तपासाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना
