Dainik Maval News : माजी राज्यमंत्री, तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे यांनी मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून विनोद पोखरकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दोन दिवसांपूर्वी बाळा भेगडे आणि विनोद पोखरकर यांच्या दरम्यान फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर, पोखरकर यांनी आपल्याला धमकावून आपली बदनामी केली असल्याची तक्रार भेगडे यांनी तळेगाव पोलिसांत दिली. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Maratha Reservation Bala Bhegde criticizes Manoj Jarange Patil Phone Call Recording Viral With Vinod Pokharkar )
संपूर्ण प्रकरण काय?
वडगाव मावळ येथे 2 ऑगस्ट रोजी मावळ भाजपाचा विजयी संकल्प कार्यकर्ता मेळावा झाला होता. या मेळाव्यात बोलताना बाळा भेगडे यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक वक्तव्य केले होते. भेगडे यांच्या त्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या मराठा समाजातील अनेक आंदोलकांनी बाळा भेगडे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांनी बाळा भेगडे यांना फोन कॉल करून वक्तव्याचा जाब विचारला होता. भेगडे आणि पोखरकर यांच्यातील संभाषणाची ही क्लीप समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली होती.
क्लीप व्हायरल झाल्यानंतर बाळा भेगडेंची पोलिसांत धाव :
बाळा भेगडे यांच्यात आणि विनोद पोखरकर यांच्यात 3 ऑगस्ट दुपारी फोन कॉल झाला, तेव्हा भेगडे त्यांच्या निवासस्थानी होते. ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भेगडे यांनी सोमवारी तळेगाव दाभाडे पोलिसांत धाव घेतली. स्वतः पोलिस ठाण्यात जात बाळा भेगडे यांनी पोखरकर यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्यात त्यांनी झालेल्या संभाषणाची माहिती देत पोखरकर यांच्या विरोधात तक्रार दिली.
बाळा भेगडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विरोधक विनोद पोखरकर यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 35(2), 352, 356 (2) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 ऑगस्ट रोजी दुपारी हा फोन कॉल झाला. याप्रकरणी 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 च्या सुमारास भेगडेंनी तक्रार दिली. कॉलवरील संभाषण समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करणे यातून माझी बदनामी केली आणि संभाषणादरम्यान धमकावले, अशी तक्रार बाळा भेगडे यांनी दिली आहे.
अधिक वाचा –
– आंबी – निगडे रस्त्यावर स्थानिक ग्रामस्थांचा रास्ता रोको, अवजड वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी । Maval News
– महत्वाची बातमी ! मावळ तालुक्यातील ‘त्या’ तिहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना । Crime News
– रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत 3000 विद्यार्थ्यांचा सहभाग । BJP Ravindra Bhegade