राज्यात सध्या टोलचा मुद्दा पुन्हा एकदा गाजताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अमित राज ठाकरे ह्यांच्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्यानंतर राज्यातील टोलप्रश्न ऐरणीवर आला आहे. मावळ तालुक्यात जुना मुंबई पुणे हायवेवर सोमाटणे टोलनाका आणि वरसोली टोलनाका ह्या दोन्ही टोलनाक्यांबद्दल सातत्याने आंदोलने होत असतात. अशात मुंबई-पुणे एक्सप्रेस वे अर्थात द्रुतगती मार्गावर देखील सामन्यांची लूटमार होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मराठी अभिनेत्री ऋतुजा देशमुख हिने याबाबत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ( Marathi Actress Rutuja Deshmukh Complaint About Pay Extra Toll In Mumbai Pune Highway )
अभिनेत्री ऋतुजा देशमुख ही तिच्या कुटुंबीयांसोबत पुण्याला निघाली होती. पुण्याला जाताना ती नेहमीच लोणावळ्याला थांबत असते. त्यानंतर पुन्हा एक्सप्रेस वेवर येऊन पुण्याला येत असते. जुलै 31 ला देखील तीने असाच प्रवास केला. परंतू या प्रवासात एक्सप्रेस वेवरील टोलझोलचा अनुभव तिला आला, ज्याबद्दल ऋतुजाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत असं दिसतंय की, मुंबई-पुणे प्रवास करताना खालापूर टोलनाक्यावर 240 रुपये आणि तळेगाव टोलनाक्यावर 80 रुपये टोल घेतला जातो. पण ऋतुजा जेव्हा पुण्याला घरी पोहोचली, तेव्हा तिच्या नवऱ्याला टोल संदर्भात मेसेज आला ज्यात खालापूरला 240 आणि तळेगावला 80 ऐवजी 240 रुपये असे एकुण 480 रुपये टोल कापला गेला होता.
अभिनेत्री ऋजुताने याबाबत ऑनलाईन तक्रार केली, पण तिला उत्तर मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी ऋतुजा पुन्हा मुंबईला यायला निघाली तेव्हा टोल नाक्यावर गाडी थांबवून तिने तेथील मॅनेजरची भेट घेतली. तेव्हा मॅनेजर ऋतुजाला म्हणाला की, “मॅडम तुम्ही लोणावळ्याला उतरलात म्हणून असा टोल कापला गेलाय. आता मुंबई ते लोणावळा 240 आणि लोणावळा ते पुणे 240 असे टोलचे दोन टप्पे जेव्हापासून फास्ट टॅग लागु झाला तेव्हापासून सुरु झालेत,” असं मॅनेजर म्हणाल्याचं ऋतुजाने व्हिडिओत सांगितलंय.
यावर ऋतुजाने, अंतर वेगवेगळे असताना असा टोल कापणे योग्य आहे का? असा प्रश्न व्हिडिओतून उपस्थित केला आहे. “मुंबई ते लोणावळा 83 किमी अंतर आहे, तर लोणावळा ते पुणे 64 किमी मग फक्त लोणावळ्याला थांबले म्हणुन दुप्पट टोल आकारण्यात आला का?” असा सवाल तिने विचारला आहे. ऋतुजाने तिच्या ह्या व्हिडिओला कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्हाला काय वाटते? अशा अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते…कारण परिणाम होईल याची खात्री नसते. यावेळी मनात आले, बोलून बघूया!! खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का?’ असा प्रश्न अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने व्हिडिओमार्फत विचारला आहे. ( Marathi Actress Rutuja Deshmukh Complaint About Pay Extra Toll In Mumbai Pune Highway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
– रास्त भाव दुकान परवान्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, 1 सप्टेंबरपर्यंत मुदत । Pune News
– काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यावर मावळ लोकसभेची जबाबदारी; महाविकासआघाडीत नेमकं चाललंय काय?