Dainik Maval News : महायुतीचे घटकपक्ष असणारे भाजपा आणि शिवसेना यांच्याकडून उमेदवारांची प्रत्येकी एक एक यादी जाहीर कऱण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप केले आहे. मात्र राज्यातील काही मतदारसंघामुळे महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत आहे. यात मावळ विधानसभा मतदारसंघ हा प्रमुखपैकी आहे. मावळमुळे महायुतीत तिढा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघ हा अलीकडील काळात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला मतदारसंघ आहे. 2019 ची निवडणूक वगळता त्यापूर्वी तब्बल 25 वर्षे येथे भाजपाचा आमदार होता. त्यामुळे 2019 चा पराभव आणि महायुती हे दोन घटक नजरेआड केल्याच भाजपाचा या जागेवर शंभर टक्के दावा आहे. दुसरीकडे 2019 साली भाजपातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले सुनील शेळके मोठ्या फरकाने येथे आमदार झाले. सोबत मागील पाच वर्षांत सुनील शेळके यांनी मोठा निधी उपलब्ध करून तालुक्यात केलेली विकासकामे आणि शेळकेंचा जनसंपर्क यासह विद्यमान आमदार म्हणून ही जागा राष्ट्रवादीलाच मिळावी यासाठी अजितदादा प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे सध्या महायुतीत मावळच्या जागेवरून भाजपा आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु आहे.
मावळचा निकाल अजून प्रलंबित
महायुतीच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यातील बऱ्यापैकी जागांचे जागावाटप पक्के झाले आहे. परंतु यात मावळची जागा अद्याप प्रलंबित आहे. एकीकडे सुनील शेळके हे विद्यमान आमदार म्हणून पुन्हा तयारीत आहेत. तर त्यांना पक्षातीलच बापूसाहेब भेगडे यांचे उमेदवारीसाठी आव्हान आहे. दुसरीकडे पारंपारिक मतदारसंघ म्हणून भाजपाकडूनही रविंद्र भेगडे आणि बाळाभाऊ भेगडे हे निवडणूकीसाठी तयारीत आहेत. अशात मावळची जागा नेमकी कोणाला जाणार, याचा निकाल प्रलंबित आहे.
अजितदादा मावळचा त्याग करणार?
महायुतीचे महाराष्ट्रातील तीन्ही प्रमुख नेते अर्थात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जेव्हा दिल्लीत अमित शाह यांना भेटायला गेले, तेव्हा अमित शाह यांनी शिंदे आणि पवार यांना मोठ्या मनाने भाजपाला काही जागा सोडण्यासाठी आग्रह केल्याचे वृत्त माध्यमांत काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री जेव्हा शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली, तेव्हा शिवसेनेने दावा केलेले पुणे आणि मुंबईतील अनेक मतदारसंघ यादीतून गाळले होते. अशात शिवसेनेने संबंधित मतदारसंघांचा त्याग केला की काय? अशी चर्चा सोशलवर सुरू आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात पिंपरी आणि मावळ वगळता महायुतीत बऱ्यापैकी जागावाटप सेट झाल्याचे दिसतंय. परंतु मावळची जागा भाजपाला मिळावी, यासाठी असलेला आग्रह पाहता, अजितदादांना महायुतीसाठी या जागेचा त्याग करणार का, की आपल्याकडेच ही जागा खेचणार, हे पाहावे लागेल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटलांसोबत प्रशासनाची बैठक
– भाजपाने दिलेली ‘ती’ जबाबदारी रविंद्र भेगडे यांनी नाकारली ; पक्षाने मावळमधून उमेदवारी द्यावी यावर ठाम ! Maval Vidhan Sabha
– मोठी बातमी ! अजित पवारांकडून यादी जाहीर, आमदार सुनिल शेळके यांचे नाव गायब, चर्चांना उधाण, पाहा यादी…