Dainik Maval News : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे दिनांक २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाच्या एक महिन्यानंतरही त्यांच्या जाण्याचा धक्का त्यांचे कार्यकर्ते, चाहते पचवू शकलेले नाहीत. मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते पै. सचिन घोटकुले हे एकेकाळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अन् पदाधिकारी होते. त्यांनाही अजित पवार यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. पक्ष बदलला तरीही अजित पवार यांच्या प्रति सचिन घोटकुले यांचे असलेले प्रेम सर्वश्रूत होते. त्यामुळे स्व. अजित पवार यांच्या जाण्यानंतर त्यांचा पुतळा सचिन घोटकुले यांनी उभारला आहे.
अजित पवार यांना दि. २८ फेब्रुवारी रोजी जाऊन एक महिना पूर्ण झाला. अजितदादांच्या निधनाच्या एक महिन्यातच पै. सचिन घोटकुले यांनी स्व. अजित पवार यांचा राज्यातील पहिला पुतळा उभारला आहे. आढले बुद्रुक या आपल्या गावी असणाऱ्या स्व मालकीच्या गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या आवारात सचिन घोटकुले यांनी स्व. अजित पवार यांचा अर्धाकृती पुतळा उभारला असून शनिवारीच (दि. २८) या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पै. सचिन घोटकुले यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या पत्नी अनिता घोटकुले ज्या गुरुकूल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या चेअरमन आहेत यांच्या पुढाकारातून हा पुतळा उभा राहिला आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष बबन भेगडे, सहकारमहर्षी माऊली दाभाडे, भाजपा नेते गणेश भेगडे, सुभाष जाधव, संतोष मुऱ्हे, विशाल वहिले, प्रशांत भागवत, दादा डफळ, संभाजी राक्षे, शिवाजी असवले आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
तसेच याप्रसंगी मावळ तालुक्यातील “स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान” ह्या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. हे प्रतिष्ठान कोणतीही निधी, देणगी न घेता स्व. अजित पवार यांच्या स्वच्छता या आवडीच्या विषयावर काम करणार आहे.
पै. सचिन घोटकुले हे वर्षभरापूर्वीपर्यंत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते.परंतू मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. तसेच, काही महिन्यांपूर्वी भाजपात पक्षप्रवेश केला. असे असले तरीही स्व. अजित पवार यांनी राजकारणात दिलेली संधी आणि सन्मान न विसरता पै. सचिन घोटकुले यांनी आपल्या लाडक्या नेत्याला खास पद्धतीत श्रद्धांजली वाहिली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या
– पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी
– कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण