पिंपरी येथे रविवारी (दि. 28 एप्रिल) मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उबाठा पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमादरम्यान मनोगतात बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांवर तसेच केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांवर जोरदार टीका टीपण्णी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळची जागा अतिशय महत्लाची – राऊत
‘प्रत्येक लोकसभेची जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. विशेषत: मावळ लोकसभा मतदारसंघात जिथे गद्दारी झाली, ही गद्दारी पूर्णपणे मातीत गाडावी लागणार आहे. त्यासाठी मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठवायचं आहे,’ असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले.
अजित पवार श्रीरंग बारणेंचा पराभव करतील – राऊत
‘2019 मावळ लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणेंनी पराभव केला होता. आता त्याच अजित पवारांना श्रीरंग बारणे यांचा प्रचार करावा लागत आहे. हि किती मोठी खंत आहे. त्यामुळे हेच अजित पवार श्रीरंग बारणेंचा पराभव करतील. अजित पवारांना आता बारामतीत नवरा म्हणून निवडणुकीत उतरावं लागत आहे. तरीही मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचा आणि बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव नक्कीच होणार,’ असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
तसेच पुढे बोलताना त्यांनी, ‘देशात परिवर्तन होणार असून येत्या 4 जूननंतर नरेंद्र मोदी नावाचे सद्गृहस्थ देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत,’ असेही म्हटले. यावेळी बोलताना संजोग वाघेरे यांनी, ‘मावळ लोकसभा मतदार संघातील स्वाभिमानी मतदार गद्दारांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. मावळमधील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक पक्षातील व्यक्ती आज आपल्या सोबत आहे. आपली मावळची जागा “मशाल’ पेठवल्याशिवाय राहणार नाही,’ अशी ग्वाही वाघेरेंनी दिली.
यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, मावळ लोकसभेचे समन्वयक केसरीनाथ पाटील, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले यांसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Maval Lok Sabha Constituency Sanjay Raut criticizes Ajit Pawar Narendra Modi and Shrirang Barne )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News
– महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पवनानगर बाजारपेठ भागात संजोग वाघेरे यांच्या मशाल चिन्हाचा जोरदार प्रचार । Pavananagar
– फक्त बघितलं म्हणून दुचाकीस्वाराच्या डोक्यावर तलवारीने वार, तरूण गंभीर जखमी, तळेगावजवळील धक्कादायक प्रकार!