‘आम्हीच बनवलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावरच टीका करू नका,’ असा टोला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ‘उबाठा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. महाविकास आघाडीने केवळ टीकेसाठी टीका करू नये, विकासावर बोलावे, असेही सामंत यांनी सुनावले. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण विधानसभा मतदारसंघात जेएनपीटी वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. ( Maval Lok Sabha Shiv Sena Candidate Shrirang Barane Mahayuti Meeting Speech Of Uday Samant )
व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, दिवंगत ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील तसेच उरण तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारणे यांना ‘रेकॉर्ड ब्रेक’ मताधिक्य मिळेल – सामंत
सामंत म्हणाले की, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार निवडणुकीला उभे आहेत, असे समजून मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे. मावळमधील सहाही आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे खासदार बारणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणाऱ्या 400 खासदारांपैकी एक असले पाहिजेत. महायुतीच्या नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांनीही एकजुटीने काम करून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मिळवलेच पाहिजे.
‘टीका करायचीच असेल तर पोहत या…’ – सामंत
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उरणमध्ये बोलताना महायुतीवर तोंडसुख घेतले होते. त्याला सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले. चांगले झाले की फुकटचे श्रेय घ्यायची काही लोकांची प्रवृत्ती असते. निवडणुका आल्या की, त्यांना बाळासाहेब ठाकरे, दि. बा. पाटील यांची नावे आठवतात. निवडणूक गेल्या की त्यांचे ‘फेसबुक लाईव्ह’ सुरू होते. केंद्र व राज्य सरकारने उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. केवळ भावनिक भाषणे देण्याऐवजी विरोधकांनी विकासावर बोलावे. उत्तम दर्जाचे रस्ते केल्यामुळे आता 55 मिनिटांत उरणला येता येते. त्याच रस्त्यावरून यायचे आणि आमच्यावरच टीका करायची हे चालणार नाही. टीका करायचीच असेल तर तुम्ही बनवलेल्या रस्त्याने या, नाहीतर पाण्यातून पोहत या, अशी खरमरीत टीका सामंत यांनी केली.
विकासाच्या मुद्द्यावर मागणार मते – बारणे
खासदार बारणे यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात झालेल्या कामांची माहिती दिली. आठ पदरी रस्ता, पनवेल-उरण रेल्वे, देशातील सर्वात मोठे विमानतळ, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, आदिवासी पाड्यांपर्यंत वीजपुरवठा, अटल समुद्र सेतू, मच्छीमारांच्या प्रश्नांचा पाठपुरावा, दत्तक ग्राम म्हणून उरणमधील बंडपाळा खोपटे गावाचा विकास केल्याचे बारणे यांनी सांगितले. केलेली विकास कामे व मतदारसंघातील संपर्क या जोरावर आपण विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथे मावळ भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न । Vadgaon Maval
– मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, आतापर्यंत 14 हजार तक्रारींचे निवारण, पुणे जिल्हा आघाडीवर
– गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाजे गावातील छत्रपती शिवरायांच्या 16 फुटी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; संपूर्ण गाव झालं शिवमय