Dainik Maval News : मावळ चे आमदार सुनिल शेळके हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. सलग दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झालेले सुनिल शेळके हे अजित पवार यांचे खास विश्वासू मानले जातात. सोबत मावळसह परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रसार प्रचारासाठी सुनिल शेळके हे महत्वाचे असल्याने त्यांना मंत्रिपद देऊन अजितदादा हा गड आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतील, अशी अटकळ बांधली जात होती. स्वतः आमदार शेळके यांनी काही विधानातून आपण मंत्रिपदाच्या रेसमध्ये असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मंत्रिपदाची यादी आली, त्यात शेळके यांचे नाव दूरदूर पर्यंत नव्हते. अशात स्वतः सुनिल शेळके यांनी आपल्याला न मिळालेल्या मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी सांगितली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत शेळके यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित झाले. त्याचवेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या तीन दिवस अगोदर मला बोलावून घेतले होते. आपल्याला दहाच मंत्रिपदं मिळाली आहेत. राज्यातील सर्व विभागाचा समतोल साधताना मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य करावा लागेल, असे सांगितले हेाते. त्याचवेळी पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असा शब्द दिला होता, असे सांगत शेळके यांनी मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्यामागची इनसाईड स्टोरी सांगितली आहे.
सुनिल शेळके बोलताना म्हणाले, महायुतीमध्ये संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीन नंबरवर आहे. आम्हाला मंत्रिपदाच्या दहाच जागा मिळाल्या. मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या तीन दिवस अगोदर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मला बोलावून घेतले होते. आपल्याला मंत्रिपदाच्या अकरा किंवा बारा जागा मिळतील, असं अपेक्षित होतं. पण आपल्याला केवळ दहाच जागा मिळाल्या आहेत. मंत्रिमंडळात वरिष्ठ आणि तरुण नेतृत्वाला संधी देताना राज्यातील सर्व विभागाचा समतोल ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे जो काही निर्णय होईल, तो आपल्याला मान्य करावा लागेल, असं मला त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मी एका क्षणात कोणताही विचार न करता पक्षश्रेष्ठी म्हणून तुम्ही जो काही निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल, असे सांगितल्याचे शेळकेंनी माध्यम प्रतिनिधीस सांगितले.
पुणे जिल्ह्यात अजित पवार आणि दत्तात्रेय भरणे ही दोन कॅबिनेट मंत्रिपदं आहेत. तिसरं मंत्रिपद द्यायचं, तर आमच्याकडे तेवढी मंत्रिपदे किंवा आमदारही तेवढे निवडून आलेले नाहीत. आमच्याकडे पूर्वी 14 ते 15 मंत्रिपदं होती, त्यावेळी पुण्याला तीन मंत्रिपदं मिळाली आहेत. पण आमच्याकडे आता दहाच मंत्रिपदं आलेली आहेत. त्यात पुण्याला दोन मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत. इतर जिल्ह्यांचा विचार करता पुणे आणि नाशिक जिल्ह्यालाच दोन मंत्रिपदं मिळालेली आहेत. पुण्यात दोन मंत्रिपदं असताना तिसरं मागणं उचित वाटलं नव्हतं. आगामी काळात कुठं ना कुठं आम्हाला संधी दिली जाईल, असे वाटतंय. पण मंत्रिपदाबाबत जो काही निर्णय झाला आहे, त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा मोठा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत, असेही आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.
दादांनी शब्द दिला नव्हता…
मावळ पॅटर्न’ला सडेतोड टक्कर देत तब्बल एक लाखापेक्षा अधिक मताधिक्क्यांनी मी निवडून आलेलो आहे. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज वैगेरे काही नाही. कारण, मी पक्षसंघटनेतून पुढे आलेलो आहे. त्यामुळे मी नाराजीच्या भावनेतून राजकारणात कधीही काम करणार नाही. मंत्रिपदापेक्षा माझ्या मावळ तालुक्यातील जनतेची कामे महत्वाची आहेत. माझ्या प्रचारसभांमधून अथवा जाहीरपणे अजितदादांनी माझ्या मंत्रिपदबाबत कोणताही शब्द दिलेला नव्हता. अजित पवारांनी शब्द दिला होता की सुनीलला आमदार करा, मी मावळला पाच हजार कोटी रुपयांचा निधी देईल. मी त्यातच समाधानी आहे, असे सांगत आमदार शेळके यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार