Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांना उमेदवारी मिळाली आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच बंडखोर उमेदवार बापू भेगडे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. बापू भेगडे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. महाविकासआघाडीने देखील भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मावळ विधानसभेत मागील काही दिवसांपासून भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात धुसफूस सुरू आहे.
ह्या पार्श्वभूमीवर सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. बाळा भेगडे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकी बाबत शेळके यांनी खुलासा केला. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मुंबईत संयुक्त बैठक झाली. महायुतीत उमेदवारीवरून पेच असलेल्या मतदारसंघांमध्ये समन्वयासाठी या बैठकीत प्रयत्न करण्यात आले. मावळातून मला व बाळा भेगडे यांना बोलाविण्यात आले होते. मी पोहोचण्यापूर्वी आधी दहा मिनिटे फडणवीस व बाळा भेगडे यांच्यात चर्चा झाली. मावळमधील भाजप कार्यकर्त्यांना महायुतीबरोबर राहावे लागेल, असे फडणवीस यांनी भेगडे यांना सांगितले. शेळके यांच्याबरोबर असलेले सर्व वाद विसरून एकत्र या,’ अशी सूचनाही फडणवीसांनी केल्याचे शेळकेंनी सांगितले.
पुढे बोलताना, ‘बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी दोन दिवसांची वेळ मागून घेतली. भाजप कार्यकर्त्यांसमोर महायुतीबरोबर काम करण्याची भूमिका स्पष्टपणे मांडा. महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराच्या व्यासपीठावर जाऊ नका, अशी स्पष्ट सूचना फडणवीस यांनी केली. आपण दिलेल्या माहितीतील एक शब्द जरी खोटा असेल, तर मी उमेदवारी अर्ज मागे घेईन.’ असे खुले आवाहन शेळके यांनी दिले आहे.
दरम्यान मावळ पॅटर्नबाबत शेळके यांना विचारले असता त्यांनी, ‘मावळ विधानसभा मतदारसंघात चार कुटुंबांच्या हिताकरिता ‘मावळ पॅटर्न’ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीचा दिलेला प्रस्ताव स्थानिक भाजपने फेटाळून अपक्ष उमेदवाराला दिलेला पाठिंबा हा चुकीचा पायंडा आहे. याचे परिणाम राज्यभरात भाेगावे लागतील,’ असा इशारा राष्ट्रवादीचे उमेदवार तथा आमदार सुनिल शेळके यांनी भाजपाला दिला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 18 उमेदवारांकडून अर्ज दाखल ; शेवटच्या दिवशी 14 उमेदवारांनी भरला अर्ज
– मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरिक्षक गार्गी जैन यांनी घेतला मतदान केंद्रांचा आढावा । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यात पारंपारिक भात कापणीला यंत्राची जोड ; पवनमावळात यंत्राच्या साहाय्याने भात कापणी सुरू