“साठच्या दशकाचा तो काळ असेल, मावळात राजकीय वैमनस्य (वैचारिक) एवढे टोकाचे होते की कॉंग्रेस आणि जनसंघाच्या कार्यकर्त्यांच्या लग्नगाठी तथा सोयरीकीही पक्षांतर्गतच होत होत्या ! मतभेद एवढे तीव्र होते. यामागे असलेल्या कारणांपैकी एक कारण म्हणजे कॉंग्रेसच्या तुलनेत जनसंघ हा शहरी तोंडवळ्याचा पक्ष होता. तळेगाव-वडगाव आणि आसपासची बोटावर मोजण्याइतकी गावं सोडली तर सर्वत्र कॉंग्रेसचे साम्राज्य! इतर खेडोपाडी चार-दोन शिकले-सवरलेले गडी सोडले तर कोणीही जनसंघाची पताका खांद्यावर घ्यायला धजत नव्हता, अशाही परीस्थितीत शहरापासून दूर असलेली ग्रामीण भागातील काही घराणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व तदनंतर जनसंघाच्या विचारांनी भारावून यथाशक्ती राष्ट्रकार्यात योगदान देत होती. त्यापैकीच स्व. बाळोबा भेगडे यांचे एक घर! ( Maval Taluka Former BJP MLA Digambar Bhegade Life Journey )
१९७० च्या दशकात संपूर्ण देशात परीवर्तनाची लाट आलेली असताना मावळात मात्र आणीबाणी पश्चात राजकीय पटलावर जनसंघाची पीछेहाट झाली. शरद पवारांच्या कुटनितीतून मावळ विधानसभा मतदारसंघही सुटला नव्हता. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत जनसंघाला पराभव पत्करावा लागला. १९८० साली द्विसदस्यीय तांत्रिक मुद्यामुळे जनता पक्षातील फुटीपाठोपाठ जनसंघाचीही तीन भागात विभागणी झाली. परंतू पुर्वाश्रमीच्या जनसंघाचे बहुसंख्य नेते व कार्यकर्त्यांनी अटलजी-अडवाणीजी यांच्या सोबत जाणे पसंत करुन भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाच्या विस्तारासाठी कंबर कसली. मावळच्या ग्रामीण पट्ट्यात कॉंग्रेसी वर्चस्व मोडीत काढून भाजपाचे कमळ फुलविणे हे खूप मोठे आव्हान पक्षासमोर होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याच दरम्यान शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळीने जोर पकडला होता, काळ्या मातीत राबणाऱ्या असंख्य हातांनी ही चळवळ उचलून धरली. शेतकऱ्यांच्या समस्यांची उत्तम जाण असलेले व स्वतः हाडाचे शेतकरी असलेले दिगंबरदादा स्वतःला या चळवळीत सहभागी होण्यापासून रोखू शकले नाहीत. यामुळेच दादांची शेतकऱ्यांशी अधिक जवळिक निर्माण झाली. भारतीय जनता पार्टीचे नवीन कमळ चिन्ह आणि पक्षाची ध्येयधोरणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने गोपीनाथजी मुंडे,प्रमोदजी महाजन यांच्यावर सोपवली होती.
हेही वाचा – इंदोरीचे उपसरपंच ते मावळचे दोनवेळा आमदार; वाचा दिगंबर भेगडे यांचा राजकीय प्रवास । Digambar Bhegade Death
शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत भाजपा पोहचवण्याची जबाबदारी पाशा पटेल यांनीही स्विकारली या त्रयींचा जेव्हा मावळात प्रवासदौरा असे त्यावेळी स्व.विश्वनाथराव भेगडे यांच्यासमवेत तत्कालीन ‘फटफटी’वर स्वार होऊन मावळातील गावन-गाव आणि वाडी-वस्ती पिंजून काढताना दादांचा नेहमीच पुढाकार असे. इंदोरी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदी निवडून देऊन जनतेने दादांच्या नेतृत्व क्षमतेला मान्यता दिली. पुढे दादा इंदोरी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून विराजमान झाले.
१९९० नंतर राष्ट्रीय पातळीवर अटलजी-अडवाणी-मुरली मनोहर जोशी यांनी तर महाराष्ट्रात मुंडे-महाजन-वहाडणे पाटील यांनी प्रचाराचा धुरळा उडवला.नव्या पक्षस्थापनेनंतर अवघ्या १०-१२ वर्षांत भाजप खेडोपाडी पोहचला.परीणामी मावळ पंचायत समितीवर भाजपाने सत्ता मिळवली. यानंतर मात्र दिगंबर दादांनी मागे वळून पाहिले नाही. पंचायत समिती-जिल्हा परीषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत किती महत्वपूर्ण कामे मार्गी लावता येऊ शकतात हे तत्कालीन भाजपा पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले. ‘टॅंकरमुक्त मावळ’ ही त्याचीच प्रचिती. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मीच्या पावलांनी मावळात भाजपाचा विजय झाला आणि त्यामागील जवळपास २० वर्षांचा वनवास संपला.राज्यातही सत्तांतर झाले. मावळात विकासकामांना वेग आला.
जेव्हा कुठल्याही पक्षाच्या हाती सत्ता येते त्याचवेळी संघटना थोडीशी सुस्त होते परंतु या पुर्वग्रही मताला छेद देऊन तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर दादांनी पायाला भिंगरी बांधून तालुका पिंजून काढला. ग्रामीण भागात संघटनेचे जाळे घट्ट विणले. याच आधारे पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाने दादांना १९९९ साली विधानसभेची उमेदवारी दिली. ‘विक्रमी उत्पादन घेणारा एक शेतकरी व बैलगाडा शर्यत प्रेमी’ मावळातील कृषक समाजाला आपला प्रतिनिधी म्हणून भावला. दादा पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
देशातील प्रत्येक गाव,वाडी-वस्ती पक्क्या रस्त्यांनी जोडण्याच्या पंतप्रधान अटलजींच्या संकल्पनेला दादांनी आमदारकीच्या कारकिर्दीत मुर्त स्वरूप देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. ‘फुफाटामुक्त रस्त्यांचा मावळ’ घडविण्यासाठी दादांनी अपार मेहनत घेतली. मावळातील नद्यांवरील महत्वाच्या पुलांची कामे पूर्ण करून घेतली. दादांसारख्या अल्पशिक्षित जातीवंत शेतकऱ्याने ‘इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट’ चे महत्व वेळीच ओळखले होते. २००४ ची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होती. त्या दिवशी बैलपोळ्याचा सन होता. मावळ्यांनी पुन्हा एकदा आपल्या बैलांच्या पुजेसह अप्रत्यक्षपणे त्यांच्यातील एक प्रतिनिधी निवडून दुसरीही पूजा पुर्ण केली.
दोन मातब्बरांसोबत लढत झाली होती, परंतु मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निकालापुर्वी जेव्हा मी स्वतः माझ्या वडीलांच्या तोंडून ‘आंदर मावळाने दिगंबर दादांना चालवलय’ हे वार्तांकन ऐकले तेव्हा मला हायसे वाटले. निकालाच्या दिवशी याची प्रचिती आली. १९९९ आणि २००४ च्या सलग दोन विधानसभा निवडणुकीत चार ढाण्या वाघांना घरी बसवून दादांनी स्वतःला ‘वनराज सिंह’ असल्याचे दाखवून दिले होते. दादांनी भाजपाचे जिल्हाध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले. आमदारकीच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत होते. या काळात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंसारख्या दिग्गज मंडळींनी मुख्यमंत्रीपद भुषविले पण विरोधी पक्षाचे आमदार असलेल्या दादांचे काम कधीही डावलले नाही.
मितभाषी वाणी, सोज्वळ स्वभाव आणि मावळ्यांचे नेतृत्व करणाऱ्या ‘टिपिकल मराठी’ पेहरावातील दादांचे वर्तन आणि कारभारही तितकाच स्वच्छ व महाराष्ट्रातील पुढाऱ्यांसाठी आदर्शवत होता. मावळच्या परंपरेनुसार दादांच्या वक्तृत्वावर संतविचारांचा तथा वारकरी संप्रदायाचा पगडा होता. स्व-व्यवसायात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे… आणि लोकप्रतिनिधी म्हणून फोडीले भांडार धन्याचा हा माल | मी तो हमाल भारवाही || ही दादांची वृत्ती होती. मतदारसंघातील कुणाचेही काम/कार्य हे तेवढेच महत्त्वाचे. त्यात लहान-मोठेपणा असा भेदभाव नाही. अशी दादांची दृष्टी होती.
भांडवलदारांचे प्रतिनिधी म्हणून दादांनी उभ्या आयुष्यात कधीही काम केले नाही किंबहुना तसे कधी दिसूनही आले नाही. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा, वारकऱ्यांना वारकऱ्यांचा, कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी दादांमध्ये दिसला. त्याचवेळी येथील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रगतीची कास धरणारा दुरदृष्टीचा नेताही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलेला होता.
अगदी दोन चार महिन्यांपुर्वीच दादांची सर्वानुमते मावळ तालुका भाजपाच्या कोअर कमिटी अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. निरपेक्ष नेतृत्वाकडे आवश्यक असलेली परीपक्वता दादांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग होती, त्यामुळेच त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. जबाबदारीची ही जाणीव आत्मसात झाल्याशिवाय दादांच्या पश्चात ही निरपेक्ष नेतृत्वाची पोकळी भरून निघणे भाजपासाठी कठीण आहे.
दादांचे विचार, त्यांचे निष्कलंक वर्तन आणि सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याची पद्धत अंगीकारणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल!”
– श्री कल्पेश विलास भोंडवे (सरचिटणीस, वडगाव शहर भाजपा)
अधिक वाचा –
– मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, थेट मुंबईत येऊन… । Sharad Pawar Gets Death Threat
– आंबी पुलासाठी जलसमाधी आंदोलन, आंदोलकांनी कंबरेएवढ्या पाण्यात चार तास उभे राहून केले आंदोलन