Dainik Maval News : विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यापासूनच मावळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले होते. त्यात बुधवारचा दिवस हा अतिशय वादळी आणि निर्णायक ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनाच दुसऱ्यांदा मावळ विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या बापूसाहेब भेगडे यांनी पक्षातील उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. पाठोपाठ मावळची जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बाळा भेगडे आणि इतर पदाधिकारी यांनी देखील पदाचे राजीनामे देत अपक्ष उमेदवार बाळाभाऊ भेगडेंना पाठींबा जाहीर केला. त्यामुळे आता मावळात सुनील शेळके यांच्या विरोधात बापूसाहेब भेगडे ही लढत तयार झाली आहे. परंतु या सगळ्यात महाविकासआघाडी काय भूमिका घेणार, याकडेही संपूर्ण मावळवासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण महाविकासआघाडीने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकासआघाडीने काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले होते. शनिवारी (दि.19) महाविकासआघाडीतील घटकपक्ष काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीन पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी परिषद घेतली आणि त्यात, मावळ विधानसभा मतदारसंघात महाविकासआघाडी स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर केले होते. सोबत कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठींबा नसल्याचेही सांगितले होते. मात्र हे सांगत असतानाच, महाविकासआघाडीत तीन घटक पक्ष आहेत. या घटकपक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आघाडीतील वरिष्ठ जो आदेश देतील, तो आदेश पाळायचा आहे. येत्या काही दिवसात पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो निर्णय आपण सर्वांनी मान्य करायचा आहे, असेही सांगितले. त्यामुळे महाविकासआघाडीचे जागावाटप होत असताना पक्षांच्या वरिष्ठांनी मावळातील पदाधिकाऱ्यांना नेमका काय आदेश दिला असेल, याची चर्चा होत आहे.
आयात उमेदवार दिला तरीही काम करणार अशी भूमिका-
याच पत्रकार परिषदेत महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जप वरिष्ठांनी आयात उमेदवार दिला तर त्याचेही काम करणार असे सांगितले होते. जर निवडून येणारा नेता असेल आणि तो महाविकासआघाडीत येत असेल, तसेच याबाबत वरिष्ठ नेत्यांनी त्या उमेदवाराला तिकीट द्यायचं जाहीर केलं, तर आम्ही त्या उमेदवाराचं काम करणार, असे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यामुळे आता सध्याच्या मावळातील राजकीय परिस्थितीत आयात उमेदवार किंवा निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार म्हणून बापूसाहेब भेगडे यांचे नाव समोर येत असल्याने महाविकासआघाडी भेगडेंना पाठींबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बापूसाहेब भेगडेंना देणार पाठींबा?
महायुतीच्या उमेदवाराचा पराभव, सोबत निवडून येण्याची शक्यता असलेला उमेदवार या पातळीवर बापूसाहेब भेगडे यांना महाविकासआघाडीकडून मावळात पाठींबा देण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीकडे अद्याप तालुका लेव्हलला सुनिल शेळके यांना थेट टक्कार देइल असा उमेदवार नाही, त्यामुळे राष्ट्रवादीतूनच फुटून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेले आणि संपूर्ण भाजपाचा पाठींबा असलेल्या बापूसाहेब भेगडे यांनाच पाठींबा देऊन महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्याच विचार महाविकासआघाडी करू शकते. त्यामुळे बापूसाहेब भेगडेंना मविआचा मावळात पाठींबा राहण्याची चर्चा मावळात सुरु आहे. तसेच बापूसाहेब भेगडे हे मविआ पुरस्कृत उमेदवार बनू शकतात, अशी शक्यता आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
– मावळात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! बापूसाहेब भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा
– राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ! मावळ विधानसभेतून आमदार सुनिल शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी, पाहा संपूर्ण यादी