Dainik Maval News : विरोधात वार्तांकन का करतेस, असा जाब विचारत महिला पत्रकाराला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यातील लोणावळा येथून समोर आला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार यांच्या दोन नातेवाईकांसह चौघांविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळ्यामध्ये 11 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर यांची पत्रकार परिषद होती. त्यानंतर आरोपींनी संबंधित महिला पत्रकाराला आडवून धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानुसार किशोर भेगडे, संदीप भेगडे व अन्य दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर भेगडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आहेत.
संबंधित पत्रकार महिलेने याबाबत पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन लेखी तक्रार अर्ज दिला. त्याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश लोणावळा शहर पोलिसांना दिले. त्यानुसार 12 नोव्हेंबरला पत्रकार महिलेची तक्रार नोंदवून घेण्यात आली.
प्रकरण काय?
लोणावळ्यात नऊ नोव्हेंबरला संध्याकाळी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे व महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांचे समर्थक आमने-सामने आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याप्रकरणाची चुकीची बातमी दिल्याचा आरोप करीत भेगडे यांच्या समर्थकांनी संबंधित महिला पत्रकाराला जाब विचारला व निवडणुकीनंतर बघून घेण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘केवळ मला बदनाम करून तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही’ : सुनिल शेळके यांचा विरोधकांना टोला
– ‘मी तालुक्यासाठी 4,158 कोटींचा विकासनिधी आणला, तुम्ही निदान 8,000 कोटींचा शब्द तरी द्या’ – आमदार शेळके
– मावळची संस्कृती बिघडवून टाकली ; बापूसाहेब भेगडे यांची आमदार सुनिल शेळकेंवर तीव्र शब्दात टीका । Bapu Bhegade