Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. मावळ मतदारसंघात एकूण सहा उमेदवार रिंगणात असले, तरीही प्रत्यक्ष लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात महायुतीचे उमेदवार आमदार सुनिल शेळके आणि अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यात होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून सध्या प्रचाराचा धुरळा सुरु आहे. दोन्ही बाजूनी आरोप – प्रत्यारोप, टीका – टीपण्णी मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे मावळ मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या तापलेलं दिसत आहे. यादरम्यान एक मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे, किंबहुना आता या मुद्द्याची धग राज्यभर पोहोचताना दिसते, ती म्हणजे ‘आमदार सुनिल शेळके यांनी धनगर समाजाचा अपमान केलाय’ अशी टीका शेळके यांच्यावर होत असून त्यांच्या भाषणाची एक क्लीप व्हायरल केली जात आहे. प्रत्यक्षात हे प्रकरण काय आहे? आमदार शेळके यांनी धनगर समाजाचा खरंच अपमान केलाय का? की या मुद्द्याचे फक्त राजकारण होतंय? हे सर्व जाणून घ्यायचे असल्यास ही बातमी संपूर्ण वाचा…
घटनेची पार्श्वभूमी…
आमदार सुनिल शेळके यांनी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी, वडगाव मावळ येथून आपल्या प्रचाराची सुरुवात केली. वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात नारळ वाढवून शेळकेंनी आपल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला प्रत्यक्ष वडगाव शहरातून सुरुवात केली. यावेळी वडगाव बाजारपेठेतून प्रचार रॅली काढल्यानंतर पंचायत समिती चौक येथे रस्त्यावरच एक छोटेखानी सभा संपन्न झाली. यावेळी आमदार सुनिल शेळके यांसह खासदार श्रीरंग बारणे, आरपीआयचे नेते सूर्यकांत वाघमारे, भाजपाचे नेते देविदास कडू आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर आमदार सुनिल शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात शेळके यांनी निवडणूकीत सोबत न राहिलेल्या आणि ऐन निवडणूकीत आपल्याला सोडून गेलेल्या पुढाऱ्यांना लक्ष केले. यावेळीच बोलत असताना शेळके यांनी माजी मंत्री मदन बाफना यांच्या एका गाजलेल्या विधानाचा दाखला देत विधान केले.
नेमकं काय म्हणाले सुनिल शेळके?
आमदार सुनिल शेळके यांच्या त्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ दैनिक मावळच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. तसेच या बातमीत देखील आपण तो जोडला आहे. त्या व्हिडिओत ८.३७ ते १०.१२ या दरम्यान सुनिल शेळके यांनी धनगर – मेंढरं याबाबत विधान केले आहे. आमदार शेळके म्हणाले की, “अरे पुढारी मंडळींनो, ज्यांनी माझी साथ सोडली, त्या पुढारी मंडळींसाठी मी काय काय केलं हे ज्या गावात जाणार त्या गावात सांगणार. का सांगणार ? तर बाफना साहेब म्हणायचे, त्यांचा एक जुणा डायलॉग होता, एक धनगर संभाळता तर बाकीची मेंढरं अपोआप मागे येतात. बाफना साहेब, तुम्ही धनगर संभाळले, तुम्ही धनगर घेऊन गेले. पण आख्खी मेंढरं माझ्या मागे आहेत. आणि त्या मेंढरांना देखील माहितीये, माझ्या मावळातील मेंढरांना देखील माहितीये, की आता धनगर मेंढरांना पुढं घेऊन जाणार आहे. धनगर खाटकाकडं चाललाय, पण माझी माणसं माझी बकरं जाणार नाही. तुम्ही काळजी करू नका. माणसांवर प्रेम केलं. एवढ्या विश्वासाने जीवापाड माणसांनी मला जपलं. दिवस पाहिला नाही की रात्र, माणसांसाठी काम केलं.”
सुनिल शेळकेंनी धनगर समाजाचा अपमान केला का?
जर वरील विधान पाहिले तर आमदार सुनिल शेळके यांनी कुठेही धनगर समाजाचा किंवा मेंढरं असं संबोधून जनतेचा अपमान केल्याचे प्रथम दर्शनी दिसत नाही. मावळ तालुक्यातील राजकीय परिस्थितीची माहिती असलेल्या कुठल्याही नागरिकाला, सोडून गेलेले धनगर म्हणजे सुनिल शेळके यांना सोडून गेलेले पुढारी आणि मागे राहिलेलील मेंढरं ही मावळची जनता जी आपल्या सोबत आहे, असं सुनिल शेळके बोललेले दिसतात. यात सुनिल शेळके यांनी जनतेने आपल्याला स्विकारुन आपल्या सोबत राहण्याचा निर्धार केल्याचा आणि पुढारी मात्र सोडून गेल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला असून त्यात माजी मंत्री बाफना यांच्या डायलॉगचा आधार घेतल्याचा दिसतो. परंतु शेळके यांचे विधान हे धनगरांचा अपमान असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करून वातावरण निर्मिती करण्याचा अथवा धनगर समाज हा शेळकेंच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रथम दर्शनी दिसते.
अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनीही केलेली टीका
सुनिल शेळके यांनी केलेल्या विधानावर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी पाच दिवसानंतर आक्षेप घेतला आणि ते विधान चुकीचे असल्याचे म्हटले. त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला. त्यात बापूसाहेब म्हटले की, “तालुक्याचे आमदार सुनिल शेळकेंनी खुप वाइट विधान केले आहे. त्यांनी असं विधान केलं, धनगर गेले आणि मेढरं राहिली. याचा अर्थ काय होतो? खरं तर हा आमच्या धनगर बांधवांचा अपमान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अपमान आहे. ज्या दिवशी या धनगर समाजाच्या काठीचा फटका त्याला पडेल, त्यावेळी तो जागेवर येइल. अशा व्यक्तीची एकच गोष्ट आपल्याला लक्षात येते की, तो जातीभेद करतो. धर्मभेद करतो. ही खरं तर आपल्या भारतासाठी, महाराष्ट्रासाठी खूप अपमानास्पद बाब आहे. खरं तर सगळी नेते मंडळी, समाजकारण करणारी मंडळी ज्यासाठी भांडतात, तो विचार एकतेच्या माध्यमातून उभा राहतो. त्या गोष्टी आपण करत नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांना तू मेंढरं म्हणाला. मेंढराची उपमा देत असताना तो काय समजतो, तो माझा परिवार आहे. प्रवाह वेगवेगळा असले, पण या भारताचे आपण नागरिक आहोत. याचे त्याला भान राहत नाही.”
एकंदरीत सुनिल शेळके यांच्या विधानाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावून किंवा त्या व्हिडिओच्या क्लीप अर्धवट दाखवून राजकीय परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे, प्रथमदर्शनी दिसत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण । Maval Vidhan Sabha
– ‘ते’ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देणार होते त्याचे काय झाले ? – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade
– मावळ तालुक्यात संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम केलंय – आमदार सुनिल शेळके । Sunil Shelke