Dainik Maval News : मावळ तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काही दिवसांपूर्वी तळेगाव येथे नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी एकमेकांना पुरक विधाने करीत संभाव्य युतीची चर्चा सुरू केली. परंतु पडद्यामागे दोन्ही पक्षांच्या स्वबळाच्या हालचाली सुरू असलेल्या दिसत आहेत. अशात शनिवारी एका कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समिती मावळकरिता पहिला उमेदवार जाहीर केला, आणि एकाच दगडात दोन पक्षी मारले.
शनिवारी ( दि. 25 ) चांदखेड येथे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त “खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके उपस्थित होते. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करीत असताना आमदार सुनील शेळके यांनी चांदखेड गणातून पंचायत समितीकरिता मा. सरपंच मनोज येवले यांच्या पत्नी सुनिता मनोज येवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ पंचायत समितीकरिता पहिला उमेदवार जाहीर करीत असल्याचे सांगत आमदार सुनील शेळके यांनी चांदखेड गणातून सुनिता मनोज येवले यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर करीत असतानाच आमदार शेळके यांनी आणखीक एक गोष्ट साध्य केल्याचे बोलले जात आहे.
मावळ पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. यात यंदाचे पंचायत समितीचे सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री करिता आरक्षित आहे. तसेच चांदखेड गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रि करिता आरक्षित आहे. त्यामुळे पंचायत समितीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यासोबत आमदार सुनील शेळके यांनी सभापती पदाचाही उमेदवार जाहीर केल्याचे बोलले जात आहे. सुनिता येवले या पंचायत समिती सदस्य होण्यासोबत पंचायत समितीच्या सभापती देखील होतील, अशी चर्चा सुरू आहे. यासोबत महायुतीची चर्चा सुरू असताना आमदार शेळके यांनी ही उमेदवारी जाहीर केल्याने आता मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता राहिल, हेही एकप्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! आमदार सुनील शेळके यांच्याकडून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर
– पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजितदादा तळेगावातील कार्यक्रमापासून चार हात दूर? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा, जाणून घ्या सविस्तर
– आस्मानी संकटाची चाहूल… मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात । Maval Taluka



